Published On : Wed, Jul 31st, 2019

वृक्षारोपण करून शहर सौंदर्यीकरणाच्या कार्याला गती द्या! : महापौर नंदा जिचकार

शहर सौंदर्यीकरण समिती बैठक

नागपूर : शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बाजुला, दुभाजकांवर, मैदान, नदी, नाले यांच्या काठावर तसेच इतर ठिकाणी वृक्षारोपन करून शहर सौंदर्यीकरणाच्या कार्याला गती द्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

नागपूर शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मास्टर प्लॉन तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार गठीत शहर सौंदर्यीकरण समितीची बुधवारी (ता.३१) महापौर सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत आयोजित बैठकीमध्ये प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, शहर सौंदर्यीकरण समितीचे समन्वयक दिलीप चिंचमलातपूरे, समितीचे सदस्य राजू खोरगडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, महा मेट्रोचे बी.व्ही. कोपूलवार, रेनबो ग्रीनर्सचे गौरव टावरी, मनोज टावरी यांच्यासह दहाही झोनचे उपअभियंता उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, येत्या पाच वर्षात नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर, हिरवेगार करून देशात क्रमांक एकचे सौंदर्य प्राप्त करून देणे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ध्येय आहे. त्यांच्या कार्याची पूर्ती व्हावी यासाठी मनपातर्फे आवश्यक ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. शहरात सर्वत्र सिमेंट रोडचे निर्माण करण्यात आले. यामधील बहुतांशी भागात सिमेंट रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. आज शहरात एकूण ५६ सिमेंट मार्ग आहेत. या सिमेंट मार्गांच्या दुतर्फा, दुभाजकांवर वाहतुकीला आणि विद्युतीकरणाला अडचण निर्माण होणार नाही अशा प्रकारे विविध प्रकारची १८ हजार ८०० झाडे लावण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करणे. याशिवाय हँगीग गार्डन, सेल्फ वाटरिंग ट्रीगार्ड लावण्याबाबत कार्यवाही करणे आदींबाबतही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देश दिले.

याशिवाय शहरातील उद्याने, मैदानांच्या सभोवताल वृक्षारोपण, तलावांचे खोलीकरण करून माती दुभाजकांवर झाडांसाठी वापरणे, तलावांच्या सभोवतालही वृक्षारोपण, दुभाजकांवर पाम व अन्य सौंदर्यीकरणात भर घालणा-या वृक्षांची लागवड करणे, नदी व नाल्यांच्या काठावर औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, अधिक काळ टिकणा-या निलगिरी, अर्जुन आदी वृक्षांची लागवड करणे आदी संदर्भात मास्टर प्लॉन तयार करण्याबाबत समितीच्या सदस्यांमार्फत येणा-या सुचनांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले.