
नागपूर : राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश दिल्यानंतर आता जिल्हानिहाय पाहणी आणि सर्वेक्षणावर भर देण्यात येत आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन शेतांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदारांनीही मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्यासाठी सध्या सर्वेक्षण सुरू असून, त्यातून मिळणाऱ्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, कमी पावसामुळे काही भागांत कृत्रिम पावसाची मागणी होत आहे. मात्र, कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झालेला नसल्याचे सांगत बावनकुळे यांनी ही शक्यता फेटाळली. परतीच्या पावसाला अद्याप वेळ असून त्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच ‘महाखनिज 2.0’च्या माध्यमातून राज्यातील खनिज व्यवहारांचे मॉनिटरिंग करण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. अवैध वाहतूक रोखण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याबरोबरच गौण खनिज नियमावलीतही सुधारणा करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत दुष्काळ जाहीर करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आपण पाच-सहा जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असून, शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.




