मुंबई – यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. धाराशिव, सोलापूर, बीड आणि अहमदनगर या भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी घुसून संसार उद्ध्वस्त झाले. पिकांचे, अन्नधान्याचे आणि घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
पूरग्रस्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय-
पूरग्रस्त नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी राज्य सरकारने मदतीचा निर्णय घेतला आहे. या कुटुंबांना शासनाकडून मोफत जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये तब्बल २५ वस्तू असणार असून, त्याची एकूण किंमत ₹२१०० इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून मंजुरीनंतर वाटपाला सुरुवात होणार आहे.
२५ वस्तूंनी भरलेली दिवाळी किट-
या किटमध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, तेल, साखर, गहू, डाळ, चणे, गूळ, मेणबत्त्या यांसह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. पूरग्रस्तांना सणाचा आनंद मिळावा, त्यांची अडचण कमी व्हावी यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.
भरपाईची प्रक्रिया सुरुच-
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनामे सुरू असून, आर्थिक मदतीसाठीही प्रयत्न गतीने सुरू आहेत. मात्र दिवाळीपूर्वी त्यांना थोडासा दिलासा देण्यासाठी हे वस्तूंचं किट देण्यात येणार आहे. शासनाचा उद्देश – “पूरग्रस्तांच्या घरातही दिवाळीचा प्रकाश उजळावा.अशा प्रकारे सरकारचा ‘दिवाळी गिफ्ट’ यंदा खास ठरणार आहे.