
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपुरात पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शालेय वाहनांवर कारवाई केली आहे.
१० मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असताना वैध परवानगी नसणे किंवा वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
मोहिमेदरम्यान रामदासपेठ येथील सोमलवार उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांवर तसेच गोरेवाडा वलय मार्ग परिसरातील पलोटी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली. ही वाहने जप्त करून प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
या मोहिमेत एकूण १०१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोटार वाहन कायद्यांतर्गत चार वाहने जप्त करण्यात आली, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) लोहित मतानी तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिक, शाळा व्यवस्थापन आणि पालकांना आवाहन केले आहे की, कुठेही विद्यार्थ्यांची बेकायदेशीर किंवा नियमबाह्य पद्धतीने वाहतूक होत असल्यास तात्काळ संबंधित विभागाला कळवावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य करावे.








