गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीची बैठक
नागपूर : झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेचा लाभ शहरातील किती लोकांना भेटला, किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याबाबतचा झोननिहाय आढावा गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती हरिश दिकोंडवार यांनी घेतला.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शुक्रवारी (ता. १८) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सभापती हरिश दिकोंडवार, उपसभापती रुतिका मसराम, सदस्य कांता रारोकर, विद्या मडावी, दिनेश यादव, साक्षी राऊत, उपायुक्त (कर) मिलिंद मेश्राम, समाज विकास अधिकारी दिनकर उमरेडकर, सहायक आयुक्त अशोक पाटील, साधना पाटील, विजय हुमणे, हरिश राऊत, प्रकाश वराडे, सुषमा मांडगे, गणेश राठोड आदी उपस्थित होते.
बैठकीत सर्व सहायक आयुक्तांनी झोननिहाय रमाई आवास योजनेतील प्रगतीची माहिती दिली. प्रत्येक झोनमध्ये किती प्रस्ताव आले आहेत, किती प्रलंबित आहेत, किती जणांना धनादेश देण्यात आले, याची सविस्तर माहिती सहायक आयुक्तांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
बैठकीची सूचना दिल्यानंतरही काही अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे पुढील बैठकीत त्यांनी उपस्थित राहून आवश्यक ती माहिती सादर करण्याचे निर्देश सभापती हरिश दिकोंडवार यांनी दिले. एसआरए विभागाने कुठलेही विभाग परस्पर न घेता त्याची माहिती समितीला देणे आवश्यक आहे. यापुढे त्यांनी प्रत्येक माहिती समितीला सादर करावी. शिवाय समितीअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांची आणि त्या योजनासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती पुढील तीन दिवसात समितीच्या सर्व सदस्यांना देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
समितीअंतर्गत राबवावयाच्या योजनांसाठी मनपाच्या अर्थसंकल्पात जी तरतूद करण्यात आली आहे ती वाटपाचे अधिकार समिती सदस्यांना देण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. समिती सदस्यांनी मांडलेल्या एका मुद्यानंतर उप्पलवाडी येथे नियमित कचरागाडी पाठविण्यात यावी, असे निर्देशही सभापतींनी दिले.