Published On : Thu, Mar 22nd, 2018

सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची होणार तपासणी

Advertisement


नागपूर: नागपूर शहरांतर्गत असलेल्या सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम एप्रिल महिन्यात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दक्षता समितीची बैठक गुरुवारी (ता. २२) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडली.

बैठकीला मनपाचे अपर आयुक्त तथा समितीचे सदस्य रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, सहायक पोलिस आयुक्त जे. एम. भांडारकर, नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ, चैतन्य शेंबेकर, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, आयएमएच्या प्रतिनिधी डॉ. वर्षा ढवळे, समिती सदस्य व मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी विणा खानोरकर, विधी सल्लागार ॲड. सुरेखा बोरकुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

सदर बैठकीत नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी शासन निर्देशाची माहिती दिली. सोनोग्राफी व गर्भपात केंद्राबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या, नागपूर महानगरपालिकेअंतर्ग़त एकूण ५७८ सोनोग्राफी केंद्र आहेत. त्यापैकी ३६२ सुरू आहेत. १२ केंद्र तात्पुरत्या स्वरूपात बंद असून २०४ बंद आहेत. या सर्व केंद्रांची आकस्मिक तपासणी १० पथकाद्वारे होणार आहे. प्रत्येक पथकामध्ये मनपाचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे आणि पोलिस प्रशासनातील प्रतिनिधींचा सहभाग असेल. या तपासणीमध्ये नेमके काय करायचे आहे, याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली.

Gold Rate
18 April 2025
Gold 24 KT 95,900 /-
Gold 22 KT 89,200 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अपर आयुक्त रवींद्र कुंभारे म्हणाले, सदर तपासणी मोहीमेसाठी आवश्यक त्या तरतुदी तातडीने पूर्ण करा. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश असेल त्यांना प्रशिक्षण देऊन आवश्यक त्या सूचना देण्यात याव्या. शासनाच्या निर्देशानुसार ही तपासणी करण्यात यावी. शासन आदेशात असलेल्या बाबींचे तपासणी मोहिमेदरम्यान पालन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

सदर बैठकीत पीसीपीएनडीटीच्या अंतर्गत कामांचाही आढावा घेण्यात आला. डॉ. पांडव यांनी बालमृत्यूसंदर्भातील माहिती नियमितपणे देण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित केले. बैठकीला मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement