नागपूर -नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा दुकानावर चाकूचा धाक दाखवून करण्यात आलेल्या लुटीचा पोलिसांनी छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सागर तिवारी या संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून लुटीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
२० ऑगस्ट रोजी सकाळी सोमलवाडा येथील तिरुपती लेआउट परिसरातील गुरु नानक किराणा भंडारमध्ये एक व्यक्ती साखर घेण्याच्या बहाण्याने दाखल झाली. दुकानात शिरल्यानंतर त्याने दुकान संचालक करमचंद जेठानी यांना चाकूचा धाक दाखवला आणि दुकानातील रोकड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर दुकान संचालकांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करत दुकानासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या सुरागाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख सागर तिवारी अशी पटवली आणि त्याला अटक केली.
पोलिसांनी आरोपीकडून लुटीची रक्कम जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सोनेगाव पोलीस करत आहेत.




