
मुंबई – महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय ठरली आहे. आतापर्यंत तब्बल अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, ही योजना राज्यातील सर्वाधिक यशस्वी योजनांपैकी एक मानली जात आहे. मात्र, आता या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत.
KYC अनिवार्य; अंतिम मुदत संपली-
लाडकी बहीण योजनेत लाभ सुरू ठेवण्यासाठी KYC (केवायसी) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. यासाठी सरकारने ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली होती. ही मुदत संपल्यानंतर आता कोणत्याही लाभार्थी महिलेला केवायसी करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचा ₹१५००चा मासिक लाभ थांबवला जाणार आहे.
KYC करूनही लाभ बंद होणार कोणाचा?
महत्त्वाची बाब म्हणजे, केवायसी पूर्ण केलेल्या काही महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थींच्या माहितीची सखोल पडताळणी केली जात आहे. या तपासणीतून ज्या महिला अपात्र ठरतील, त्यांचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाईल.
उत्पन्न आणि वयोमर्यादा ठरणार निर्णायक-
KYC दरम्यान महिलांचे तसेच त्यांच्या वडील किंवा पतीचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे.
ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल.
यासोबतच, योजनेत ठरवलेल्या वयोमर्यादेत न बसणाऱ्या महिलांनाही अपात्र ठरवले जाणार आहे.
अपात्र लाभार्थींवर सरकारची कडक नजर-
योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंतच पोहोचावा, यासाठी सरकारने ही पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना, केवायसी असूनही, ₹१५००चा हप्ता मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेतील या बदलांमुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, सरकारकडून अधिकृत मार्गदर्शनाची मागणी होत आहे.








