बाजारगाव – नागपूर-अमरावती महामार्गालगत असलेल्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री भीषण स्फोट घडला. या दुर्घटनेत कंपनीतील सुपरवायझर मयूर गणवीर (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ कामगार जखमी झाले आहेत. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हा स्फोट बुधवारी रात्री १२.३४ वाजता कंपनीच्या पीपी-१५ या युनिटमध्ये झाला. त्या वेळी रात्रीची पाळी सुरू होती आणि अनेक कामगार विविध विभागांमध्ये कार्यरत होते. स्फोट इतका तीव्र होता की बाजारगावासह शिवा, सावंगा व परिसरातील दहा गावांमध्ये त्याचे हादरे बसले. नागरिक घाबरून घराबाहेर पडले. लाखो रुपयांचे साहित्य व यंत्रसामग्री जळून खाक झाली.
स्फोटानंतर जखमींना तातडीने नागपूरला हलविण्यात आले. यातील १४ कामगारांवर रवीनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर उर्वरित दोघांवर राठी हॉस्पिटल, धंतोली येथे उपचार सुरू आहेत. डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झालेल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दुर्घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनीही उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा सोलार परिसरात भेट दिली. वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका व नागपूरहून दाखल झालेल्या वैद्यकीय पथकाने जखमींना तातडीने उपचारासाठी हलविले.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की, महामार्गावर सिमेंटच्या विटा व मलबा फेकला गेला. बाजारगाव व शेजारील गावांतील घरांच्या भिंतींना तडे गेले, खिडक्यांच्या काचा तडकल्या आणि दरवाज्यांचे कुंडे तुटले. अनंततारा हॉटेलच्या दोन्ही मजल्यांवरील काचादेखील फुटल्या.










