
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीच्या जलाशयात पर्यटकांसाठी आता सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीतून सफारीचा नवा अनुभव घेता येणार आहे. १ ऑक्टोबरपासून ‘सोलर बोट सफारी’ला सुरुवात होत असून, केरळमधून आणलेल्या प्रत्येकी २४ प्रवासी क्षमतेच्या दोन सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटी सज्ज करण्यात आल्या आहेत. या बोटींच्या माध्यमातून आवाज आणि प्रदूषण कमी ठेवत जलाशयातील निसर्ग, पक्षी आणि वन्यजीव न्याहाळता येणार आहेत.
कोलितमारा येथून सफारीचे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिला मार्ग कोलितमारा ते नांदपूर-नगारागोटा असा असून, त्याचे अंतर सुमारे ८ ते १० किलोमीटर आहे. या सफारीसाठी सुमारे दीड तास लागणार आहे. नांदपूर कुटी येथे पर्यटकांसाठी विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गासाठी सोमवार ते शुक्रवार ४०० रुपये, तर शनिवार आणि रविवारी ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दिवसभरात सकाळी ६ ते ८, ८.३० ते १०.३०, ११ ते १, १.३० ते ३.३० आणि ४ ते ६ अशा पाच फेऱ्या होणार आहेत.
या सफारीत नांदपूर परिसरातील वाकाटककालीन ऐतिहासिक वारसा आणि कुंदरा भीमसेन देवस्थान पाहता येणार आहे. याशिवाय पक्षी निरीक्षणासोबतच जलाशय परिसरात मगरींचे दर्शन होण्याची शक्यता आहे. पाणवठ्यावर येणारे वाघ, गवे, चितळ, सांबर, भेकर आणि मोरही पर्यटकांना पाहता येणार आहेत.
दुसरा मार्ग कोलितमारा-कुंदरा भीमसेन-परत असा असून, या मार्गाची लांबी सुमारे २५ ते २८ किलोमीटर आहे. या सफारीचा कालावधी तीन तासांचा राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार ८०० रुपये, तर शनिवार-रविवार १,१०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या मार्गावर सकाळी ६ ते ९, १० ते १ आणि दुपारी २ ते ५ अशा तीन फेऱ्या असतील.
सफारीचे ऑनलाइन बुकिंग पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळावर, तर ऑफलाइन बुकिंगची सुविधा कोलितमारा येथील मानको टुरिझम कॉम्प्लेक्सच्या बुकिंग काउंटरवर उपलब्ध राहणार आहे.




