Published On : Sat, Feb 10th, 2024

सॉफ्टवेअर क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि उद्योगांनी प्रादेशिक क्षमता गरज यांचा विचार करून आपले संशोधन शाश्वत विकासासाठी विकसित केले पाहिजे -केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

सॉफ्टवेअर टेकनॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाच्या इन्क्युबेशन सुविधेचे नागपूरात उद्घाटन
Advertisement

सॉफ्टवेअर उद्योगांनी तसेच स्टार्टप्सने प्रादेशिक क्षमता तसेच कमतरता,गरज यांचा विचार करून आपले संशोधन शाश्वत विकासासाठी विकसित केले पाहिजे. यासाठी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया- एसटीपीआय यासारख्या संस्थांनी विदर्भातील शैक्षणिक आणि अभियांत्रिकी संशोधन संस्थांसोबत समन्वय, संवाद आणि सहकार्य ठेवले पाहिजे आणि सामान्य माणसाच्या जीवनमानात बदलाव घडवून येतील असे शाश्वत संशोधन केले पाहिजे असे आवाहन आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया एसटीपीआय च्या नागपूरच्या गायत्री नगर येथे इंक्युबॅशन फॅसिलिटीची सुरुवात आज गडकरींच्या झाली त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाप्रसंगी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया- एसटीपीआय चे महासंचालक अरविंद कुमार, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, एसटीपीआय पुण्याचे महासंचालक संजय कुमार गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील निर्यातीला चालना देण्यासाठी एसटीपीआय सुविधेचा फायदा होणार आहे असे सांगून आयात वाढवून आणि निर्यात कमी करून आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करू शकतो असे गडकरी यांनी नमूद केले. विकासाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हे सांगून त्यांनी नागपूरमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रावर काम करणारे सेंटर ऑफ एक्सलन्स आणि एंटरप्रिनरशिप हे एसटीपीआय तर्फे स्थापन झाले पाहिजे अशी सूचना केली. आज ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग वाहन निर्मिती उद्योग क्षेत्रामध्ये भारत जगात सध्या तिसऱ्या नंबर वर असून पुढील पाच वर्षात आपल्याला प्रथम क्रमांकावर जायचं आहे असे देखील त्यांनी सांगितलं . नागपूरच्या मिहान मध्ये आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचा विस्तार होत असून आतापर्यंत 68 हजार युवकांना रोजगार मिळाला आहे पुढील एक वर्षात आपण 1 लाख युवकांना रोजगार देण्याचे ध्येय ठेवले आहे अशी माहिती देखील गडकरींनी यावेळी दिली.

एसटीपीआयचे महाराष्ट्रात मुंबई, नागपूर ,पुणे ,नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणी सहा प्रादेशिक केंद्र असून एसटीपीआय सेंटर ऑफ इंटरप्रेनरशिप अर्थात उद्यमशीलता केंद्र हे पुणे येथे इलेक्ट्रॉनिक व्हेईकल मध्ये आर्टिफिशल इंटेलीजन्स क्षेत्रात कार्यरत आहे तर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात हे केंद्र कृषी तंत्रज्ञानाबाबत कार्यरत आहे अशी माहिती सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया- एसटीपीआयचे महासंचालक अरविंद कुमार यांनी दिली. नागपूरच्या गायत्री नगर भागात 1,965 चौरस फुटाच्या जागेवर बांधलेल्या इमारतीमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान संबंधित सेवा , स्टार्टअप्स, उद्योजक, लघु मध्यम उद्योग यांची वाढती मागणी लक्षात घेऊन, एसपीटीआयने 229 प्लग-अँड-प्ले आसन व्यवस्थेसह सुमारे 28 हजार 151 चौरस फूट परिसरामध्ये ही इन्क्युबेशन सुविधा उभारली आहे. या इनक्युबेशन सुविधेचा वापर माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान संबंधित सेवा , उद्योजक आणि युनिट्सद्वारे हाय-स्पीड डेटा कम्युनिकेशन प्रदान करण्यासाठी संसाधन केंद्र म्हणून केला जाईल, ज्यामुळे विदर्भातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याप्रसंगी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे यांनी त्यांच्या मंत्रालयातर्फे ग्रामीण भागात वित्तीय साक्षरता तसेच डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली .डिजिटल नागपूर साठी देखील आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितलं.

याप्रसंगी भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आयआयएम सोबत स्टार्ट अ‍प साठी परिसंस्था तयार करण्यासाठीचा एक सामंजस्य करारावर एसटीपीआय आणि आयएमच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अंतर्गत मागासवर्गीयद्वारे आणि एसटीपीआयकडून चालू करण्यात आलेल्या सेंटर ऑफ एंटरप्रिनरशिप वित्तीय सहायता म्हणून 50 हजार रुपये धनादेश सुद्धा यावेळी केंद्राना सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडीयाचे अधिकारी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ, कर्मचारी उपस्थित होते