Published On : Tue, Jun 30th, 2020

अँप बंदीच्या माध्यमातून चीनच्या गुप्त कटाला सुरुंग , सोशलमेडियातूनच चिनी सिन्ड्रोम संपुष्टात येणार – अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

अँपच्या माध्यमातून बालवयीन तसेच तरुणाईला जाळ्यात ओढून भविष्यातील ग्राहक तयार करण्याच्या चीनच्या “उद्योगांना’ केंद्र सरकारने जोरदार धक्का दिला. त्यामुळे आता भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मानसिकतेचा लाभ घेऊन उत्पादने गळी उतरविण्याचा चीनच्या गुप्त एजेंद्यावर पाणी फेरले गेलेच, शिवाय भारतीय अर्थ व्यवस्थेला यातून बळकटी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु यासाठी भारतीय सोशल मीडियावर चीनच्या तुलनेत सरस सामाजिक मानसशास्त्रीय आखणी करून पाऊले उचलावी लागणार आहे.

चीनने विविध अँपचा वापर करीत चिनी तंत्रज्ञान, उत्पादनाचा पुरस्कार करणारी पिढी तयार करण्याचे काम केले. चीनचे हे उद्योग म्हणजे ‘सोशल मीडिया मानसशास्त्रीय युद्ध ‘ असल्याचे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नमूद केले. आतापर्यंत सुरु असलेल्या अँपच्या माध्यमातून चीनने भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मानसिकतेवर पकड मजबूत केली. अँपवरील व्हिडीओतुन चिनी उत्पादनाची सवय भारतीयांना लागेल, अशी गुप्त योजना चीनची होती. मात्र आता सरकारने चीनची भारतीयांच्या मनावरील पकड सैल करण्यासाठी ५८ अँप बंद केले. त्यामुळे भारतीय उत्पादकांना चीनची मक्तेदारी संपुष्टात आणण्याची संधीही चालून आली आहे. एकेकाळी डोनाल्ड, छोटा भीम ही कार्टून लहान मुलांना आवडत होती. गेल्या काही वर्षात निन्जा, डॉरेमोन या कार्टूनने मुलांच्या मनाचा ठाव घेतला. ही मुले जशी मोठी होत गेली, तसे चीनने विविध अँप आणून त्यांच्या मनावरील ताबा कायम ठेवला. या अँपच्या माध्यमातून येणारे व्हिडीओ चीनचे उत्पादने, कारखान्यातील आकर्षक उत्पादननिर्मिती, तेथिल स्टोर्सचा प्रसार करणारे होते, असे पारसे यांनी स्पष्ट केले. एकप्रकारे चीनने लहान मुलांपासून ते तरुणाईपर्यंत साऱ्यांनाच मोहजाळयात ओढण्यासाठी भारतीय मानसिकतेचा गैरफायदा घेत फँटसी तयार केली.


आज प्रत्येकाकडे मोबाईल असून चिनी अँप स्क्रीनवर आहेत. यात काही टिकटॉकसारखे आहेतच, शिवाय ऑनलाईन खरेदीचे अँपही आहेत. या अँपमधून चीनची उत्पादने भारतीयांच्या नजरेत भरली. चीनचे अँप बंद केल्याने भारतीयांच्या मनावरील चिनी अँपचे गारुड संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता भारतीय सोशल मीडियाने व्यवसायिक दृष्ट्या परिपक्व होण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर कोवळ्या वयातील मेंदूवर चीनने त्यांची उत्पादने रुजविण्याचा जो प्रयत्न केला, त्यालाही आळा बसणार आहे. मात्र चायना सिंड्रोम काढण्यासाठी भारतीय उद्योजक, व्यावसायिकांना प्रयत्न करण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली. किंबहुना चीनच्या तुलनेत अधिक व्यवसायिक व सामाजिक मानसशात्रीय पाऊले उचलावी लागणार आहे. चायना सिंड्रोम हा आर्थिक व्हायरस असून त्यावर अचूक मात्रा शोधल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था बळकट होणार नाही, अशी पुस्तीही पारसे यांनी जोडली.

चायना सिंड्रोम नि विविध अँपद्वारे भारतीयांच्या घराघरात चिनी उत्पादने पोहोचली. लहान मुलेही चिनी उत्पादनाचा हट्ट करीत असल्याने पालकही लाचार झाले. परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे चिनी अँप मोबाईलमधून डिलीट होतील. त्यामुळे चायना सिंड्रोम काढणे शक्य होणार असून स्वदेशी उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ काबीज करता येईल. हीच पाऊले आत्मनिर्भर भारताकडे जाणारी आहे. मात्र उत्पादक, व्यावसायिकांना सोशल मीडिया साक्षर व्हावे लागणार आहे. शिवाय ऑनलाईन बाजारपेठेसाठी नवनव्या संकल्पना आत्मसात कराव्या लागतील.

– अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.