Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 30th, 2020

  -तर २ जुलैला नगरसेवकांसोबत महापौरांचेही उपोषण

  चंदननगरचे कर संकलन कार्यालय बॅडमिंटन हॉलमध्ये हलविले : नगरसेवकांचा विरोध, महापौरांनी दिला अल्टीमेटम

  नागपूर, : आधीच खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय हलविले. याला नगरसेवकांनी विरोध केला आणि मंगळवारी कर विभागाचे कर्मचारी आत असताना कुलूप ठोकले. महापौर संदीप जोशी तेथे पोहचले. त्यांनी प्रशासनाच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करीत मंगळवारी सायंकाळी पाच वाजतापर्यंत हॉल रिकामा करण्याचे निर्देश दिले. तसे झाले नाही तर २ जुलै रोजी नगरसेवकांसोबत आपणही हॉलसमोर उपोषणाला बसणार, असा अल्टीमेटम दिला.

  मंगळवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर, उषा पॅलट, शीतल कामडे यांच्यासह परिसरातील नागरिक हनुमाननगर बॅडमिंटन हॉल येथे पोहचले. हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय चंदननगर येथील शाळेत होते. ती इमारत जीर्ण झाल्याकारणाने प्रशासानाने ते कार्यालय हनुमाननगरच्या बॅडमिंटन हॉलमध्ये हलविले. हया बॅडमिंटन हॉलचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या परिसरातील मुलांना खेळण्याच्या दृष्टीने त्याची निर्मिती करण्यात आली. नूतनीकरण झाल्यानंतर पुढील काही दिवसातच त्याचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच मनपा प्रशासनाने कर संकलन कार्यालय तेथे स्थानांतरीत केले. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक आणि नागरिकांनी आज सरळ हॉल गाठून तेथील कर्मचाऱ्यांना आत बंद केले आणि हॉलच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकले.

  महापौर संदीप जोशी यांना याबाबत माहिती मिळताच ते तेथे पोहोचले त्यांच्या सोबत उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समिती सभापती विरेंद्र कुकरेजा होते. प्रशासनाच्या या कृतीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात खेळाची मैदाने, विविध खेळांसाठी आवश्यक असलेले हॉल आदी साधने उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असताना आणि मनपा पदाधिकारी त्यासाठी कटिबद्ध असताना उपलब्ध साधने प्रशासकीय कार्यासाठी बळकावणे, हे मनपा प्रशासनाला शोभणारे नाही, या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तेथे उपस्थित हनुमान नगर झोनचे उपअभियंता हेडाऊ यांना सदर हॉल सायंकाळी ५ वाजतापर्यंत रिक्त करण्याचे निर्देश दिले. तसे झाले नाही तर २ जुलै रोजी प्रभागातील सर्व नगरसेवक नागरिकांसह उपोषणाला बसतील आणि त्यामध्ये आपण स्वत: सहभागी होऊ, असा इशारा दिला.

  सहायक आयुक्तांना ‘कारणे दाखवा’
  सदर प्रकरण नागरिकांशी संबंधित होते. नागरिकांनी त्यासंदर्भात तक्रार केली. नागरिकांची गर्दी जमली. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापौर संदीप जोशी स्वत: तेथे पोहचणार होते. ही माहिती असतानाही हनुमाननगरच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे यांनी मुख्यालयात बैठकीचे कारण सांगून तेथे येण्यास असमर्थता दर्शविली. याची गंभीर दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145