Published On : Fri, Nov 22nd, 2019

राजकारणातील समाजसेवक महापौर संदीप जोशी

नागपूर : नागपूर शहराचे ५३ वे महापौर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते संदीप जोशी यांची निवड झाली. नगरसेवक ते महापौर या प्रवासादरम्यान त्यांनी नागपूर महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेता अशी विविध महत्त्वाची आणि मानाची पदे भूषवित प्रत्येक पदावर आपली छाप सोडली. राजकारण आणि समाजकारण यांचा सुंदर मेळ असलेले व्यक्तीमत्त्व म्हणून संदीप जोशी यांची ओळख असून महापौर म्हणून ते आपला कार्यकाळ गाजवतील, अशी अपेक्षा आहे.

समाजकारण हा मूळ पिंड असलेले नगरसेवक संदीप जोशी हे संघटन बांधणीतून राजकारणात दाखल झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेली नाळ, उत्तम कार्यकर्ता, कुशल प्रशासक आणि समाजसेवेच्या विविध आघाड्यांवर ते सतत कार्यरत राहिले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघाचे पालकत्व संदीप जोशी यांच्याकडे आले ज्याला त्यांनी योग्य न्याय दिला. विधानसभा निवडणुकीत एकीकडे राज्याची खिंड माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढवित असताना त्यांच्या मतदारसंघात संदीप जोशी यांनी किल्ला लढविला आणि पुन्हा एकदा सर केला.

Advertisement

संदीप जोशी यांनी सन २००२ मध्ये राजकारणात प्रत्यक्ष उडी घेतली. महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००७, २०१२ आणि सन २०१७ मध्ये सलग निवडून येत त्यांनी आपल्या लोकप्रियतेची प्रचिती दिली. चार वेळा नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी सन २०१०-११ आणि सन २०११-१२ असे सलग दोन वर्ष स्थायी समितीचे सभापती म्हणून कार्यभार सांभाळला. मनपाच्या ५२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच व्यक्तीला सलग दोनदा स्थायी समिती सभापती होण्याचा मान मिळाला, ते म्हणजे संदीप जोशी. या काळातील त्यांच्या कार्याची दखल घेत स्थायी समिती सभापती म्हणून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत आचार्य प्र.के.अत्रे पुरस्काराने त्यांना पुणे येथे सन्मानित करण्यात आले.

२०१० ते २०११ या काळात नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजविली. २०१२ ते २०१७ ला तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्यानंतर मनपाचे सत्तापक्ष नेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. यानंतरही सन २०१७ च्या निवडणुकीत चौथ्यांदा निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा सत्तापक्ष नेता म्हणून पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडे जबाबदारी सोपविली. नागपूर महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या १७ वर्षाच्या कार्यकाळात विविध पदे भूषवितानाच त्यांनी अनेक मोठ्या कामांना आकार दिला. विकासकामांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेगाव तलावाचे खोलीकरण करण्यास आरंभ केला. दरवर्षी आटणाऱ्या सोनेगाव तलावात या खोलीकरणामुळे यंदा मे महिन्यापर्यंत पाणीसाठा होता. तलावाच्या आजूबाजूच्या विहिरींतील जलपातळी वाढण्यास यामुळे हातभार लागला. स्थायी समिती सभापतीच्या कार्यकाळादरम्यान सीमेंट रस्त्यांना आकार देण्यास प्रारंभ केला. शहरातील रस्ते खड्डे विरहीत असावेत या उद्देशातून २६ कि.मी.चे मुख्य रस्ते सीमेंट काँक्रीटचे बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या निर्णयामुळे आज संपूर्ण शहरात सीमेंट रस्त्यांचे जाळे विणल्या गेले आहे.

नागपुरातील देशपांडे सभागृहाच्या भाडेवाडीनंतर सांस्कतिक कार्यक्रमासाठी अडचण निर्माण झाली होती. नामदार नितीनजी गडकरी यांनी रेशीमबाग येथे कलावंतांना कमी दरात सभागृह मिळावे या भावनेतून भव्य सभागृह निर्मितीची मनिषा व्यक्त केली. संदीप जोशी यांनी ती पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि विदर्भातीलच नव्हे तर राज्यातील अतिभव्य कविवर्य सुरेश भट सभागृहाने आकार घेतला. खासदार क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन हे संदीप जोशी यांच्या कुशल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे.

सुदर्शन समाजाच्या मागणीची दखल घेत नंदनवन येथील भगत कॉलनी येथे ५७ लाख रुपये खर्चून महर्षी सुदर्शन धाम साकारत शहराचे आरोग्य जपणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. नागपूर शहर प्रदूषणमुक्त व्हावे या दृष्टिकोनातून महाल येथील तुळशीबाग आणि रामदासपेठ काचीपुरा येथे तुळस उद्यान करण्याचा निर्णय त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतला. प्राणवायू देणाऱ्या या उद्यानामुळे नागरिकांसाठी मोठी सोय झाली.

संदीप जोशी यांनी आपल्या महत्त्वाच्या पदावरील कार्यकाळात केवळ सेवा देणाऱ्या नागपूर महानगरपालिकेची ‘सांस्कृतिक जाणीवा जपणारी महानगरपालिका’ अशी नवी ओळख करवून दिली. नागपूर महोत्सव, गौरव सोहळा, दिवाळी पहाट, अभिवादन शेवाळकर अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनामुळे मनपाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला.

श्री. संदीप जोशी यांनी राजकारणात सक्रीय असताना आपले सामाजिक उत्तरदायित्वही पूर्णपणे निभावले. ‘सप्तरंग सहजीवनाचे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लग्नाला २५ वर्ष पूर्ण झालेल्या एक हजार जोडप्यांचा सत्कार केला. विविध राज्यातून उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरू केलेली ‘दीनदयाळ थाली’ ही त्यांचा सामाजिक कार्याचा परमोच्च बिंदू ठरली. प्रायोगिक तत्त्वावर गोरक्षण सभा धंतोली येथे आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रांगणात सुरू केलेला दीनदयाळ थाळी प्रकल्प आज दररोज १२०० लोकांना केवळ १० रुपयांत लंच बॉक्स देतो.

दीनदयाळ रुग्ण सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत दोन हजारपेक्षा अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविल्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुमारे ८०० रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचा लाभ दिला. मेडिकलमधील रुग्णांना स्वच्छ आणि चांगले कपडे मिळावे यासाठी त्यांनी अधिष्ठातांशी भेटून ही बाब लक्षात आणून दिली आणि विनंती केली. सुमारे २३०० रुग्णांसाठी दोन जोड कपडे पुरवून ही समस्या निकाली काढली. याच प्रकल्पांतर्गत दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात फिरता दवाखाना सुरू केला. दिवसांतून दोन वेळा दोन वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या या फिरत्या दवाखान्यातून दोन वैद्य रुग्णांवर उपचार करुन मोफत औषधे देतात. आजपर्यंत सुमारे १५ हजार रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.

संदीप जोशी यांनी नुकतीच एक अभिनव कल्पना मांडली. ‘दीनदयाल अनोखे दुकान’ हे या कल्पनेचे नाव. त्यांनी लोकांना अडगळीत असलेल्या वस्तू अशा दुकानात आणून देण्याचे आवाहन केले. जनतेने याला प्रतिसाद दिला. अशा वस्तू अनोख्या दुकानात आल्या ज्याचा लाभ ज्यांना त्या वस्तूंची गरज आहे, त्यांना होऊ लागला.

दीनदयाल थाळीनंतर रुग्ण नातेवाईकांची निवासाची समस्या लक्षात घेता दीनदयाळ निवारा प्रस्तावित असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात तो प्रस्तावित आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना गादी, चादर आणि सामान ठेवण्यासाठी लॉकर या प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांना आंघोळीची व अन्य व्यवस्थाही पुरविण्यात येईल.

अशा समाजकारणातील राजकीय व्यक्तीमत्त्व असलेला नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांचा महापौरपदाचा कार्यकाळ नवे काहीतरी निर्माण करणारा, विकासाचे नवे उच्चांक प्रस्थापित करणारा, क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील नागपूरची प्रतिमा अधिक उजाळणारा आणि विविध समाजाच्या मागण्यांची परिपूर्तता करणारा असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापौर संदीप जोशी शनिवारी (ता. २३) रोजी दुपारी ४ वाजता मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात महापौर पदाचा कार्यभार स्वीकारतील.

Advertisement
Advertisement
Advertisement