
नागपूर : इंस्टाग्रामवर चाकू दाखवून धमकावणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट-५ पथकाने अटक केली. त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकेश ऊर्फ निक्या रितेश लिंगायत (१९), रा. बाबा बुद्धनगर, वैशालीनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १० ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे युनिट-५ पथक फरार व अभिलेखावरील आरोपी तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेत होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर चाकू दाखवून धमकावणाऱ्या तरुणाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला असता आरोपी पवन बुद्ध विहार परिसरात चाकूसह आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन धारदार चाकू जप्त केला.
या प्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व जप्त शस्त्र पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.




