Published On : Fri, Jun 21st, 2019

सोशल मिडियावर ‘बाहुबली’ तर यश पायदळी : अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक

प्रचाराच्या खर्चात 80 टक्क्यांनी घट शक्य, चार वर्षात सोशल मिडिया वापरकर्त्यांत दुप्पट वाढ.

नागपूर: कुठलीही निवडणूक प्रचार, प्रचारसभा व त्यावरील अवाढव्य खर्चाशिवाय होत नाही, असा गेली अनेक वर्षे असलेला समज आता सोशल मिडियामुळे कमी होण्याची चिन्हे दिसून येत आहे. गेल्या चार वर्षात सोशल मिडिया वापरकर्त्यांत दुपटीने वाढ झाली असून सोशल मिडियाचा योग्य वापर केल्यास निवडणुकीत प्रचारासाठीच्या खर्चात 80 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली.

Advertisement

पुढे विधानसभा निवडणूक असून आतापासून काही उमेदवारांनी तयारी सुरू केली. विधानसभा निवडणुकीतही सोशल मिडियाचा वापर होईल. मात्र, त्याचा योग्य वापर केल्यास उमेदवारांना प्रचारावरील खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करणे शक्य असल्याचे पारसे यांनी नमुद केले. प्रचारसभा, रॅलीसाठी मोठ्या नेत्यांना बोलावणे, त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्चासह वाहनांचा ताफा, मोठा शामियाना, साऊंड सिस्टिम, कार्यकर्त्यांना देण्यात येणारी रसद, प्रचार साहित्य यावर उमेदवारांचा होणारा खर्च कोट्यवधींचा असून तो टाळता येईल. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदार क्षेत्रातून सात लाख मतांनी निवडून आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी कुठलीही प्रचारसभा, रॅली न काढता केवळ सोशल मिडियावरून जनतेशी थेट संवादातून यश मिळविले. त्यातुलनेत मोठ्या प्रचारसभा घेऊनही अनेकजण तोंडघशी पडले. सद्यस्थितीत भारतीय सोशल मिडिया वापरर्त्यांचा 29 टक्के वेळ ‘ऑन स्क्रिन टाईम’ खर्च होत असून केवळ मनोरंजन म्हणून पुढे आलेला सोशल मिडिया आता 100 टक्के संवादाचे माध्यम ठरत आहे. सोशल मिडिया संवेदना आदान-प्रदान करण्याचे मुख्य व्यासपीठ आहे.

Advertisement

सोशल मिडियाकडे मात्र अद्यापही कानाडोळा करण्यात येत आहे. 2014 च्या निवडणुकीत ज्या पक्षांनी सोशल मिडियाच्या ताकदीकडे कानाडोळा केला, त्यांना नंतर पश्चातापाची वेळ आलेली सर्वांनीच बघितली. नुकताच झालेल्या निवडणुकीतही सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यात अपयश आल्याने निवडणुकीतही यश आले नाही. त्यामुळे सोशल मिडियाचा पूर्ण ताकदीने वापर करणाऱ्यांना पुढील निवडणुकीत खर्च वाचविण्याची संधी असल्याचे पारसे म्हणाले.

देशात वाढली सोशल मिडियाची ताकद:
स्टॅटिस्टा डॉट कॉमच्या सर्वेक्षणानुसार 2015 मध्ये भारतात 15 कोटी सोशल मिडिया वापरर्ते होते. 2019 मध्ये ही संख्या 35 कोटींवर पोहोचली असून 2023 पर्यंत 45 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतात फेसबुक वापरकर्त्यांची संख्या सद्यस्थितीत 20 कोटी 60 लाख आहे. अमेरिकेत मात्र केवळ 10 कोटी 90 लाख फेसबुक वापरकर्ते आहे. या आकड्यावरूनच भारतीय सोशल मिडिया वापरकर्त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो.

कमीत कमी शैक्षणिक पात्रता असलेला व्यक्ती सुद्धा मोबाईल, सोशल मीडियाचा वापरकर्ता आहे. फेसबुक, वॉट्‌सअप व इतर तत्सम माध्यमाने तो समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करीत आहे. आज सरकारी योजनाची माहिती, त्याचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक जण सोशल मिडियाचा वापर करीत आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत सोशल मिडिया वापरकर्ता व उमेदवार यांच्यात दुतर्फी संवाद झाल्यास प्रचारसभा व त्यानिमित्त होणारा खर्च टाळता येईल.

– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement