Published On : Wed, Apr 1st, 2020

महावितरणच्या कर्मचार्‍यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

नागपूर: सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र बंद असताना हातावर पोट असलेल्या मजूरांना अन्न-धान्याची मदत करीत महावितरणच्या कर्मचार्‍यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे.सध्याच्या परिस्थितीत महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.पण सर्वत्र बंद असताना अनेकांना आपले पोट कसे भरायचे याची चिंता लागली आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी महावितरणच्या महाल विभागातील कर्मचारी समोर आले.या कर्मचार्‍यांनी वर्गणी गोळा करून अन्न-धान्य खरेदी केले.यात तांदूळ,आटा, तुर डाळ,तेल,कांदे, बटाटे साहित्य कामठी परिसरात जुनी कामठी,गोरा बाजार,आजनी, कळमना परिसरात असलेल्या मजुरांना याचे वाटप केले.या कामी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव, मंगेश कहाळे, सहायक अभियंता योगेश इटनकर, श्रीकांत बहादुरे, मनिष वाकडे, वसीम अहमद यांनी पुढाकार घेतला.

मौदा परिसरात मध्य रात्री वीज पुरवठा सुरळीत

मंगळवारी रात्री आलेल्या वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे खंडित झालेल्या सुमारे दहा हजार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने मध्य रात्री सुरळीत केला.

मौदा परिसरात मंगळवारी रात्री वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे चिरव्हा आणि धनी वीज उपकेंद्र मधून होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता.सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र बंद असताना महावितरणच्या जनमित्रांनी कठीण काळात वीजपुरवठा सुरळीत केला.अशी माहिती कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी दिली.