
नागपूर : जिल्ह्यातील अवैध रेती तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पारशिवनी तहसीलमधील पेंच नदीच्या काठावर असलेल्या पालोरा रेती घाटातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा करून कोट्यवधी रुपयांची चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दीर्घकाळ सुरू असतानाही महसूल विभाग व पोलिस यंत्रणेला याची कुठलीच माहिती नसल्याचे दिसून येते.
स्थानिक नागरिकांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासन हालचालींना लागले. रेती वाहतुकीचे मार्ग बंद करण्यासाठी तातडीने रस्त्यावर खड्डा खोदून तस्करी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अवैध उत्खननाला जबाबदार कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व रेती घाट अधिकृतरीत्या बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही घोघरा, बाबुलवाडा, मेहंदी, पिपळा, गवना, गरंडा, डोरली, बखारी आणि माहुली परिसरातून अवैध रेती वाहतूक सुरूच आहे. ही तस्करी प्रशासनाच्या नजरेसमोर घडत असताना अद्याप कोणत्याही मोठ्या तस्करावर ठोस कारवाई झालेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, पालोरा रेती घाटातून सुमारे पाच फूट खोलीपर्यंत, वीस फूट रुंदीच्या पट्ट्यात आणि जवळपास दोनशे मीटर लांबीच्या क्षेत्रातून रेती उपसण्यात आली आहे. सर्व रेती घाट बंद असताना हा गैरप्रकार कसा आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरत आहे.








