Published On : Fri, Dec 15th, 2017

स्मिता पाटील यांच्या स्त्रिविषयक भुमिका आजही जिवंत – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

Advertisement

Pankaja Munde
नागपूर: व्यक्तिमत्व हे केवळ चेहऱ्यावरून ठरविता येत नाही. विचार, आचार, खरेपणा आणि ताकद हे व्यक्तिमत्वाचे महत्वाचे पैलू आहेत. दिवंगत स्मिता पाटील या अशाच व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. विविध चित्रपटातून त्यांनी केलेल्या स्त्रिविषयक भुमिका आजही जिवंत वाटतात, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

राष्ट्रभाषा संकुलातील बाबुराव धनवटे सभागृहात विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्मिता स्मृती पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कवी कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मेघे, कार्याध्यक्ष गिरीश गांधी, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, सुनील लिमये आदी उपस्थित होते.

स्मिता पाटील यांच्याजवळ आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्व होते, असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांनी 1980 च्या दशकात अतिशय दर्जेदार चित्रपट केले. त्यांनी विविध चित्रपटातून सामाजिक भुमिका साकारून समाजाला एक संदेश दिला. स्त्रियांचे प्रत्येक पैलू त्यांनी आपल्या अभिनयातून मांडले. “जैत रे जैत”, “उंबरठा”, “मिर्च मसाला” अशा अनेक चित्रपटात त्यांनी अविस्मरणीय भुमिका केल्या. आजही त्या जिवंत असत्या तर शेतकरी व महिला या विषयांवर त्यांनी भुमिका केल्या असत्या, असे त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ. पंकज चांदे म्हणाले, स्मिता पाटील यांना केवळ 31 वर्षाचे आयुष्य मिळाले. एवढ्या कमी कालावधीत त्यांनी उत्कृष्ट अभिनय साकारला. त्यामुळेच त्यांची ख्याती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे.

यावेळी दिलीप वळसे पाटील आणि यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्व. संपत रामटेके यांच्यावतीने जया रामटेके आणि रंगभुमी या क्षेत्रात कार्यरत असलेले विरेंद्र गणवीर यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि धनादेश देउन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे गिरीश गांधी यांनी तर संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.