Published On : Wed, Jun 12th, 2019

समिता चकोले यांनी सांभाळला नेहरूनगर सभापतिपदाचा पदभार

Advertisement

नागपूर : नेहरुनगर झोनचे नेतृत्व आता महिला पदाधिकाऱ्याच्या हातात आहे. समिता चकोले ह्या सभापतिपदाच्या काळात नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या कार्यकाळात नेहरू नगर झोनच्या विकासकामांना नवा आयाम मिळेल, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिकाअंतर्गत असलेल्या नेहरूनगर झोनच्या सभापतिपदी नुकतीच समिता चकोले यांची निवड झाली. सोमवारी (ता. १०) त्यांनी पदभार स्वीकारला. पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंचावर आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मावळत्या सभापती रिता मुळे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, प्रतोद दिव्या धुरडे, दुर्बल घटक समितीचे सभापती हरिश दिकोंडवार, जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, सतरंजीपुरा झोनच्या सभापती अभिरुची राजगिरे, नगरसेविका वंदना भुरे, स्नेहल बिहारे, चेतना टांक, भाजप शहर संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, सहायक आयुक्त हरिश राऊत, उपअभियंता नरेश शिंगणजुडे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, नगरसेविका म्हणून समिता चकोले ह्या वाठोडा परिसरातील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. झोन सभापती म्हणून नवीन जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. ही जबाबदारीही त्या यशस्वीरीत्या पार पाडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार सुधाकर कोहळे यांनीही यावेळी विकास कामांचा उल्लेख करीत समिता चकोले यांच्या माध्यमातून नेहरू नगर झोनचा शाश्वत विकास होईल, असे प्रतिपादन केले. अन्य मान्यवरांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना सभापती समिता चकोले यांनी, वरिष्ठ नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवू आणि झोनमधील विकास कामांची गती वाढवू. नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राध्यान्य देऊ, असे आश्वासन दिले.

यानंतर सभापती समिता चकोले यांनी मावळत्या सभापती रिता मुळे यांच्याकडून पदभार स्वीकारला. उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.