Published On : Fri, Jul 14th, 2017

मनपाच्या योजनांची ई-रिक्षाद्वारे “स्मार्ट” जनजागृती

Advertisement

e-rickshaw
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने धरमपेठ झोनने ई-रिक्षा खरेदी केला असून “पब्लीक अनाऊंसमेंट सिस्टीम”द्वारे मनपाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी या ई-रिक्षाला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी प्रामुख्याने सत्तापक्षनेते संदीप जोशी, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र कुंभारे, नगरसेविका परिणीता फुके, अमर बागडे, कमलेश चौधरी, उज्वला शर्मा, रुतिका मसराम, प्रमोद कौरती, सुनील हिरणवार, सहायक आय़ुक्त (कर) मिलिंद मेश्राम, धरमपेठ झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे, धरमपेठ झोनचे अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.

मनपाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृतीकरिता आजवर वापरण्यात येणा-या ऑटोवर मोठ्याप्रमाणावर खर्च होत होते. शिवाय याद्वारे प्रदूषणही होत होते. झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे यांनी ई-रिक्षाची संकल्पना झोन सभापती रुपा राय यांच्याकडे मांडली. या संकल्पनेला प्रतिसाद देत, सभापती रुपा राय यांनी आपल्या स्वच्छा निधीतून ई-रिक्षा साठी निधी मंजुर केला. झोनकडे स्वतःचे ई-रिक्षा आल्याने याद्वारे प्रदूषणमुक्त आणि अल्प खर्चात मनपाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. ई-रिक्षा एकवेळा पूर्ण चार्ज केल्यावर 8 तास उपयोगात येतो. तसेच झोनच्या कर्मचा-यांनाही देखिल एखादी तक्रार सोडविण्यासाठी जायचे असल्यास चार कर्मचारी यामध्ये बसून जाऊ शकतात अशी व्यवस्था आहे. अशा प्रकारे बहुउपयोगी “ई-रिक्षा” द्वारे स्मार्ट पद्धतीने धरमपेठ झोन मनपाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे. ई-सेवा पुरविणारे नवीन अद्ययावत केंद्रदेखिल मनपाचे धरमपेठ झोनमध्ये सुरु झाले होते, हे विशेष. या अद्ययावत केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले होते.

अभय योजना जनजागृतीसाठी उपयुक्त
17 जुलै ते 7 ऑगस्ट 2017 दरम्यान मनपातर्फे राबविण्यात येणा-या अभय़ योजनेची जनजागृती करण्यासाठी हे ई-रिक्षा उपयुक्त ठरणार असून याद्वारे प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चात अभियानाची जनजागृती करण्यात येईल हे विशेष.