Published On : Sat, Aug 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

स्मार्ट वीज मीटर: डिजिटल क्रांती आणि पारदर्शक सेवेची नवी दिशा – मुख्य अभियंता राजेश नाईक

Advertisement

महावितरणतर्फे ग्राहकांना अधिक पारदर्शक, अचूक आणि आधुनिक सेवा देण्यासाठी संपूर्ण वीज प्रणालीचे डिजिटल आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. या अंतर्गत नागपूर जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी होत असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 6 लाख 23 हजार 385 ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक आज दिली.

या नवीन तंत्रज्ञानाबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काही शंका किंवा गैरसमज असणे स्वाभाविक असल्याचे स्पष्ट करत, महावितरणचे नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी स्मार्ट मीटरशी संबंधित सर्व तांत्रिक बाबी, ग्राहकांचे हित आणि प्रकल्पाची पारदर्शकता स्पष्ट केली आहे.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढल्याची चर्चा ऐकायला मिळत असली, तरी ती पूर्णपणे असत्य आणि चुकीची आहे. हे मीटर प्रिपेड नसून पोस्टपेड आहेत, त्यामुळे ग्राहकांना आधीप्रमाणेच बिलिंग सायकलनुसार वीज बिल मिळेल. हे अत्यंत उच्च अचूकतेने (High Precision) डिझाइन केलेले डिजिटल उपकरण असून, जेवढी वीज प्रत्यक्षात वापरली जाते, तेवढेच अचूक बिल ग्राहकांना मिळते. यामुळे पारदर्शकता वाढली असून मानवी हस्तक्षेपाचा वाव पूर्णपणे संपला आहे. नागपूर जिल्ह्यात एप्रिल 2026 पासून वाढीव बिलाच्या एकूण 379 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी बहुतांश ठिकाणी बिल योग्य असल्याचे आढळून आले आहे. ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे 800 ठिकाणी चेक मीटर बसविण्यात आले असून त्यांच्या समांतर रीडिंगच्या नोंदी सुरू आहेत. बहुतांश ठिकाणी स्मार्ट मीटर आणि चेक मीटरच्या नोंदीत काहीही तफावत आढळलेली नाही.

अनेकदा ग्राहकांच्या मनात मीटर बदलासाठी शुल्क आकारले जात असल्याबाबत शंका असते. मात्र, हे नवीन स्मार्ट मीटर ग्राहकांच्या घरी पूर्णपणे निःशुल्क बसवून दिले जात असून यासाठी कोणतेही तात्कालिक किंवा अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. जुन्या मीटरच्या जागी नवीन मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना दिली जाते आणि मीटर बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे महावितरण किंवा संबंधित एजन्सीचे ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. नागपूर परिमंडलात यासाठी मे. मॉन्टे कार्लो या नामांकित कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. असेही राजेश नाईक यांनी सांगितले.

Advertisement

ते पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत (RDSS) संपूर्ण देशात हे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. यामुळे मीटर रीडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले असून ग्राहकांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून दररोजच्या वीजवापराचे खाजगी नियोजन करणे सोपे झाले आहे. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीची व डेटा गोपनीयतेची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून, हा डेटा अत्याधुनिक सायबर सुरक्षा यंत्रणेद्वारे पूर्णपणे सुरक्षित ठेवला जातो आणि तो कोणत्याही तृतीय पक्षाला व्यावसायिक कारणांसाठी दिला जात नाही. यात सुरक्षित आरएफ किंवा सेल्युलर तंत्रज्ञानाचा वापर केला असून, नेटवर्क खंडित झाल्यास मीटर स्वतःमध्ये डेटा सुरक्षितपणे साठवून ठेवतो (Store and Forward तंत्रज्ञान) व नेटवर्क पूर्ववत झाल्यावर डेटा स्वयंचलितपणे मुख्य सर्व्हरकडे पाठवला जातो.

जर एखाद्या ग्राहकाला मीटरच्या अचूकतेबद्दल शंका असेल, तर ग्राहकाने अर्ज केल्यास त्याचे मीटर ऍक्युचेक मशिनच्या सहाय्याने वेगवेगळ्या लोड फॅक्टरवर तीन वेळा तपासले जाते. तसेच ग्राहकाच्या मागणीनुसार समांतर चेक मीटर देखील लावला जातो. किंवा ग्राहक त्यचे मीटर चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची मागणी त्यासाठी विहित शुल्काचा भरणा करुन पाठवू शकतो. लॅब टेस्टमध्ये मीटर सदोष आढळल्यास भरलेले शुल्क परत केले जाते आणि नियमानुसार बिलात तात्काळ दुरुस्ती किंवा समायोजन केले जाते.

केंद्रीय वीज प्राधिकरणाचे (CEA) नियम, RDSS मार्गदर्शक सूचना आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) नियमावलीनुसार ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. हा बदल राज्याच्या वीज वितरण प्रणालीला एका नव्या डिजिटल युगात नेणारा असून, यात ग्राहकांचे हित, पारदर्शकता आणि अचूकता केंद्रस्थानी आहे, असल्याचेही मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना स्मार्ट मीटर समवेत नॉन स्मार्ट मीटर समांत्र जोडून मीटर नोंदणीचे प्रात्याक्षिक देखील दाखविण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, संजय वाकडे, प्रफुल लांडे, दिपाली माडेलवार यांचेसोबत कार्यकारी अभियंता चंदन तल्लरवार, राहुल जीवतोडे, अमित शिवलकर. वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग फाटे, अजित जिचकार, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर उपस्थित होते.

फोटो ओळ; स्मार्ट मीटरबाबत माहिती देतांना मुख्य अभियंता राजेश नाईक, सोबत अधीक्षक अभियंता अमित परांजपे, प्रफुल लांडे, संजय वाकडे, दिपाली माडेलवार व इतर अधिकारी

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.