Published On : Sat, Apr 8th, 2017

प्रत्येकाच्या आवाक्यातील सुविधा उपलब्ध करुन देणे, हेच स्मार्ट सिटीचे सूत्र – मुख्यमंत्री


नागपूर:
समाजातील प्रत्येक घटकाच्या आवाक्यातील सर्व नागरी सुविधा असणे, प्रत्येक नागरिकाला परवडेल अशा सोयी-सुविधांचा विस्तार म्हणेच स्मार्ट सिटीचा खरा सिद्धांत असून त्याशिवाय स्मार्ट सिटी साकारणे शक्य नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने इलिट्स टेक्नोमिडिया प्रा. लि च्या सहकार्याने हाटेल लि मेरिडीयन येथे आयोजित दोन दिवसीय स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी शिखर संमेलन समारोप प्रसंगी ते बोलत होते. मंचावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदाताई जिचकार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आय़ुक्त के. व्यंकटेशम, उबर इंडियाच्या संचालिका श्वेता राजपाल कोहली, विश्वराज इंफ्रास्ट्रक्चरचे अरुण लाखानी, टाटा रियालिटीचे संजय उबाळे, इलिट्सचे सीईओ डा. रवि गुप्ता उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्प राबविताना सद्यस्थितीत असलेल्या योजना आणि नागरिकांच्या गरजा यावर प्रकाश टाकताना मा. मुख्यमंत्री पुढे म्हणाले प्रत्येक शहराकडे पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, मुलभूत सुविधा आदी उपलब्ध आहेत. मात्र या सेवांवर होणारा खर्च कर स्वरुपात समाजातील फक्त एक विशिष्ट वर्गाकडून वसूल करण्यात येतो. या नागरी सुविधांच्या विस्तारात समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान असणे आवश्यक आहे. या घटकावर लक्ष केंद्रीत करुन अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच ख-या अर्थाने स्मार्ट सिटी साकारणे होईल. तसेच नागरिकांना दर्जेदार सुविधा दिल्यास नागरिकही या सेवांसाठी स्वतः पुढाकार घेऊन योगदान देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. लोकसहभाग हे स्मार्ट सिटीचे मुलभूत सूत्र आहे. जो पर्यंत नागरिकांना कुठलाही प्रकल्प आपला वाटत नाही तोपर्यंत कुठलेही तंत्रज्ञान वापरले तरी ते यशस्वी होणार नाही. नागरी सुविधांचा लाभ समाजातील अखेरच्या व्यक्तीपर्यंत ज्यादिवशी पोहोचेल त्या दिवशी स्मार्ट सिटीचा साकारण्याचा उद्देश साध्य होईल असेही ते म्हणाले.


पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीवर भर – ना. गडकरी

सध्या वाहतूक व विविध सेवांसाठी पेट्रोल व डिझल सारखे पारंपरिक इंधन वापरण्यात येत आहे. या इंधनावर अवलंबून असलेल्या सुविधाही महाग ठरतात. मात्र अपारंपरिक ऊर्जास्त्रोताद्वारे इंधन निर्मिती केल्यास परवडणा-या दरात मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देता येतील. सोबतच पर्यावरणाचे रक्षणही होईल असे सांगत लवकरच अपारंपरिक ऊर्जारिस्त्रोतापासून निर्मित करण्यात येणा-या इंधनावर संशोधनासाठी एक हायटेक प्रय़ोगशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुढील तीन महिन्यात बायो इथेनाल, बायो सिएनजी, इलेक्ट्रीकवर वाहने धावतील व एक मे पासून नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर २० इलेक्ट्रीक टॅक्सी धावणार आणि हे करणारे नागपूर हे देशातील पहिले शहर ठरेल असे त्यांनी सांगितले.

नागपुरातील सुरेश भट सभागृह, नागपूर मेट्रो आदी ठिकाणी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार असून यामुळे अत्यअल्पदरात या सुविधांचा लाभ नागपूरकरांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरात होऊ घातलेल्या लंडन स्ट्रीटमुळे एक हजार कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. महसूल वाढविणे आवश्यक असून त्याशिवाय स्मार्ट सिटी साकारणे शक्य नाही. संसाधने, तंत्रज्ञान, नियोजन जरी महत्त्वाचे असले तरी दुर्दम्य राजकिय इच्छाशक्ती असल्याशिवाय कुठलेही स्वप्न साकारणे शक्य होणार नाही. नागपूर मेट्रोला दोन पावरफुल इंजिन मुख्यमंत्री आणि माझ्यास्वरुपात लाभले असल्याने नागपूरची मेट्रो ही बुलेट ट्रेन पेक्षाही सुसाट वेगाने धावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी महापौर नंदाताई जिचकार यांनी दोन दिवसीय स्मार्ट सिटी शिखर सम्मेलनाचा धावता आलेख मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दुरदृष्टी असलेले नेतृत्व नागपूरला लाभल्याने नागपूरचा कायापालट होऊन लवकरच स्मार्ट सिटीत रुपांतर होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिखर सम्मेलनात सहभागी झालेल्या प्रतिनिधिंची माहिती दिली. दोन दिवसात ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली त्याचा संक्षिप्त आढावा घेतला. यावेळी फिलिप्स लायटिंगचे हर्ष चितळे, विश्वराज इंफ्रास्ट्रक्चरचे अरुण लाखानी, उबेर इंडियाच्या श्वेता राजपाल कोहली यांनीही आपले विचार मांडले. इलिस्टचे सीईओ रवि गुप्ता यांनी उपस्थितांचे आभार मानले.


पुस्तकाचे प्रकाशन

शिखर संमेलनात इलिट्सतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ई-गव्हर्नंस आणि पी. शेखर लिखीत “नागपूर- फर्स्ट सुपर स्मार्ट सिटी” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “नागपूर- फर्स्ट सुपर स्मार्ट सिटी”चे लेखक पी शेखर यांनी पुस्तकाबद्दलची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

१० अचिवर्सचा सत्कार

शिखर संमेलनादरम्यान देशभरातील स्मार्टसिटी डोमेन अंतर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्ती आणि संस्थांना यावेळी ना. नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये नागपूर मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सांडपाणी व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी ग्रेटर हैद्राबाद मनपाचे आयुक्त डा. जनार्दन रेड्डी, हेमंत कुमार शर्मा, चंडीगडच्या महापौर आशाकुमारी जैस्वाल, बिलासपुरचे महापौर किशोर राय, जार्ज कुरविल्ला, रायपूरचे महापौर प्रमोद दुबे आणि आयुक्त रजत बंसल, वाहतुक आयुक्त प्रविण गेडाम, फिलिप्सचे हर्षवर्धन चितळे आणि सिस्को यांना सन्मानित करण्यात आले. शिखर सम्मेलनाच्या आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडणारे नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त डा. रामनाथ सोनवणे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.