नागपूर : मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांवर अखेर तोडगा निघाला आहे. परिवहन सभापती मंगला ताई खेकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, 1 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या तत्पर बैठकीत संघटनेच्या संपूर्ण मागण्या मान्य करण्यात आल्या.
मा. प्रवीण भाऊ दटके यांच्या नेतृत्वाखाली मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी संप पुकारला होता. या आंदोलनाला 14 ऑक्टोबर 2024 रोजी यश मिळाले आणि त्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र, या अधिसूचनेचा लाभ केवळ चालक आणि वाहकांना देण्यात आला होता. इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नव्हता. तसेच वाहकांना घरभाडे भत्ताही लागू करण्यात आलेला नव्हता.
या प्रश्नांसाठी प्रवीण भाऊ दटके आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 4 फेब्रुवारी 2025 रोजी महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर 12 मे 2025 रोजी प्रवीण भाऊ दटके यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह वाहकांच्या घरभाडे भत्त्याच्या प्रश्नावर बैठक घेण्यात आली.
यानंतर संघटनेने सातत्याने पत्रव्यवहार तसेच विविध बैठका आणि सभा घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. 15 जुलै 2026 रोजी प्रवीण भाऊ दटके यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटूनही त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने संघटनेने 3 सप्टेंबर 2026 पासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर आज परिवहन सभापती मंगला ताई खेकरे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने बैठक घेण्यात आली. बैठकीत संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून सर्व मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रस्तावित बेमुदत संपापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना हिरवा कंदील मिळाला आहे.
यावेळी महापौर नीता ताई ठाकरे, सत्तापक्ष नेते बाल्या भाऊ बोरकर, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी ताई दानी आणि परिवहन सभापती मंगला ताई खेकरे यांचे संघटनेचे नागेश भाऊ सहारे यांनी आभार मानले.




