Published On : Wed, Mar 3rd, 2021

रोजगार निर्मितीसाठी कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ तयार व्हावे : ना. गडकरी

Advertisement

मिहानमध्ये 56 हजार लोकांना रोजगार

नागपूर: नागपूर आणि परिसरात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करण्यासाठी ज्या प्रकारच्या कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्यानुसार मनुष्यबळ तयार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

महापालिकेच्या वतीने सक्षम टेक्निकल कार्यक्रमात ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बेालत होते. बुटीबोरी इंडस्ट्रिज असोसिएशननेही यासाठी पुढाकार घेतला. यावेळी कौशल्य विकास आयुक्त, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- मिहानमध्ये आणखी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. उद्योजकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. आगामी काळात रोजगारासाठी कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ लागणार असून तसे मनुष्यबळ तयार करण्याची गरज आहे.

बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन, मनपा या संस्थानी आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सहकार्याने कंपन्यांना कोणते कौशल्य असलेले मनुष्य हवे याचा अभ्यास करून ते उपलब्ध करून द्यावे.

मिहानमध्ये आतापर्यंत 56 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या 2-3 वर्षात 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. खाजगी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यायांशी संपर्क केला तर कंपन्यांना आवश्यक कौशल्य असलेले मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वासही ना.गडकरी यांनी व्यक्त केला.