Published On : Wed, Sep 4th, 2019

‘सीताबर्डी ते लोकमान्य नगर’ २० रुपयात होणार मेट्रोने प्रवास

Advertisement

नागपूर लवकरच नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ एक्वा लाईन’वर (लोकमान्य नगर ते सीताबर्डी सीताबर्डी इंटरचेंज) मेट्रोच्या प्रवासी सेवेला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महा मेट्रोने प्रवाश्यांसाठी मेट्रोचे प्रवासी दर निर्धारित केले आहे. त्यामुळे आता सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर पर्यंत एकूण ११ किमी’चा प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना केवळ २० रुपये मोजावे लागतील.

तसेच सीताबर्डी इंटरचेंज ते सुभाष नगर पर्यंतच्या प्रवासासाठी १० रुपये आणि सुभाष नगर ते लोकमान्य नगर पर्यंतच्या प्रवासासाठी १० रुपये प्रवाश्यांना द्यावे लागतील. तर महा मेट्रोने नुकतेच नागरिकांसाठी जारी केलेल्या महा कार्डने मेट्रोचे तिकीट खरेदी केल्यास १० टक्क्याने सवलत देखील प्रवाश्यांना मिळणार आहे.

नागपूर मेट्रोचे रिच-१ सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा सुरु आहे. तर आता लवकरच रिच-३ एक्वा लाईन’वर देखील मेट्रोच्या प्रवासी सेवेला सुरवात होणार आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरु झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

हिंगणा मार्गावर लोकमान्य नगर व आजूबाजूचा संपूर्ण परिसर औद्योगिक व खाजगी कंपन्या, शाळा-महाविद्यालाय तसेच रहिवासी क्षेत्राने व्यापलेला आहे. तेव्हा अधिकारी/कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाहून सतत प्रवास करत असतात. मेट्रो सेवा सुरु होताच सवलतीच्या दरात या सर्वांना मेट्रोने सुरक्षित व आरामदायी प्रवास करता येणार आहे.