मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची ताकद वाढताना दिसत आहे. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. तसेच भाजपात प्रवेश करताना त्यांनी जय श्रीरामचा नाराही दिला. अनुराधा पौडवाल या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतल्या प्रसिद्ध गायिका आहेत.
जय श्रीराम! मी आज भाजपाची सदस्य झाली आहे. मला आज खूप आनंद झाला आहे. कारण मी आज त्या सरकारशी जोडली गेले आहे ज्या सरकारचं नातं सनातन धर्माशी आहे.
मागच्या ३५ वर्षांहून अधिक काळ मी भक्तिगीतं गातं आहे. सुरुवातीला मी सिनेसृष्टीतही गायले, त्यानंतर मी भक्तिगीतंच म्हणते आहे.
मला अनेकदा वाटायचं की मी घेतलेला हा निर्णय योग्य की अयोग्य. मात्र समाधान या गोष्टीचं आहे की रामलल्लाची स्थापना झाली तेव्हा मला तिथे पाच मिनिटांसाठी गाणं म्हणता आले. त्यामुळे माझा निर्णय योग्यच होता, असेही त्या म्हणाल्या.