Published On : Sat, Mar 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझी मिळकत

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : सौरऊर्जाचलित मोटराइज्ड ट्रायसिकलचे वितरण
Advertisement

नागपूर – नागपूरसह संपूर्ण विदर्भात कुणालाही शारीरिक व्यंग आहे म्हणून उदरनिर्वाह चालविण्यास अडचण निर्माण होऊ नये, त्यांना जीवन जगताना अडचणींचा सामना करावा लागू नये, असा माझा प्रयत्न आहे. त्याच उद्देशाने कृत्रिम अवयव लावून देणे, ट्रायसिकलचे देणे हे कार्य सुरू आहे. दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझी मोठी मिळकत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या वतीने आणि विशाखापट्टणम येथील आंध्रप्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड) यांच्या विशेष सहकार्याने नागपुरातील दिव्यांगांना सौरऊर्जाचलित मोटराइज्ड ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी शनिवारी (दि. १६ मार्च) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘शिक्षण, आरोग्य, शेतकरी, गरीब यांची सेवा करण्यात मला आनंद मिळतो आणि माझ्यासाठी तेच खरे राजकारण आहे. ट्रायसिकल मिळाल्यानंतर दिव्यांगांना रोजगारासाठी मोठे साधन उपलब्ध झाले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कमालीचे समाधान देणारे आहे.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें… तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा’ या ओळींमधून सेवा हाच धर्म असल्याचे तुकाराम महाराज सांगतात. मी या ओळींचा आदर्श ठेवून काम करतो.’ नागपूर लोकसभा क्षेत्रातील सगळे लोक माझा परिवार आहे. सर्वांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी मी प्रयत्न करतो. सगळीच कामे मी करू शकत नाही. पण माझे प्रयत्न सातत्याने सुरू असतात आणि ते करताना जात, पात, धर्माचा विचार करत नाही, असेही ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले.

अशी आहे मोटराइज्ड ट्रायसिकल
सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरुपातील मोटराईज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टीमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचे इलेक्ट्रिक चार्जिंगदेखील शक्य आहे. त्यादृष्टीने एक पॉवर केबल त्यासोबत देण्यात आला आहे. समायोजित (अॅिडजस्टेबल) होऊ शकणारे हँडल आणि बॅटरी पातळी निर्देशक ही ट्रायसिकलची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

Advertisement