Published On : Wed, May 10th, 2017

मालवण बंद: सिंधुदुर्ग ‘किल्ला विकणे आहे’, या बॅनरमुळे संताप


मालवण:
पर्यटकांना मालवणात आकर्षणाचं ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. मात्र आता हा ‘किल्ला विकणे आहे’ अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आले आहे. मालवण किल्ल्यानप असा बॅनर लावल्याने स्थानिकांचा संताप झाला आहे. याचा विरोध करण्यासाठी ‘मालवण बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या पर्यटकांचे हाल होण्याची शक्यता आहे. आणि यामुळेच स्थानिक व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रेरणोत्सव समितीनं हा बंद पुकारला आहे. किल्ला विक्रीचा फलक लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजाराम कानसे, सुमित कवटकर, प्रसाद कवटकर अशी या तिघांची नावं आहेत. तिघंही जण सिंधुदुर्गातलेच रहिवासी आहेत. तर नितीन शिर्सेकर हा फरार झाल्याची माहिती आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहे.

मालवण बंदमध्ये होडी व्यावसायिक आणि स्कुबा व्यावसायिकही सहभागी होणार आहेत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मालवणमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे आजच्या बंदमुळे पर्यटकांची गैरसोय होण्याची चिन्हं आहेत. मालवणमध्ये तारकर्ली आणि देवबाग या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. आणि ऐन सुट्ट्यांच्या दिवसात अशी गैरसोय झाल्यामुळे पर्यटकांची पंचायत झाली आहे.