| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 3rd, 2021

  सर्व अनाथ बालकांच्या व्यथा सारख्याच असल्याने सरकारने योजना सर्वांना सारखीच लागू करावी – डॉ. विटनकर

  ·बालसंगोपन योजनेतील तरतूद अत्यल्प.
  ·अनाथ बालकांना एकरकमी रु. पाच लाखासोबत मासिक रु 3000 द्यावे.
  ·आरोग्य विमा व पदवी पर्यंत मोफत शिक्षण मिळावे.

  नागपूर: सर्व अनाथ बालकांच्या व्यथा सारख्याच असल्याने कोरोना संसर्गात पालकांचे (कर्ता पालक किंवा दोनही पालक) छत्र हरवलेल्या बालकांसोबतच इतर कोणत्याही कारणांनी दोनही पालक गमावलेल्या बालकांना एकरकमी रुपये पाच लाखाच्या आर्थिक मदती सोबतच वयाच्या 21 वर्षापर्यंत मासिक तीन हजार रुपये, आरोग्य विमा व पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, अशी मागणी महिला व बाल विकास विषयाच्या अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ ऍड अंजली साळवे विटनकर यांनी मुख्यमंत्री ना. उद्दव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार, महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

  जागतिक महामारी ठरलेल्या कोविद-19 मुळे राज्यात हजारोच्या संख्येने बळी गेले आहेत, शेकडो कुटुंब उध्वस्त झाली. यात अनेक बालकांनी आपले आईवडील तर काहींनी आपला कर्ता पालक गमावला आहे. अश्या बालकांच्या मदतीसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाअंतर्गत गठीत बाल न्याय समिती, नवी दिल्ली यांचेकडून दि. 5 मे 2021 च्या आढावा बैठकीमध्ये, “राज्यातील कोविड -19 मुळे बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांची व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठीत करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कृती दल (task force) गठीत करण्यात आला आहे.

  कोविद-19 मुळे पालक गमावलेली काही बालके बालगृहात तर काही त्यांच्या नातेवाईकांकडे राहत आहेत. परंतु कर्ता पालक किंवा दोनही पालक गमावलेल्या बालकांचे संगोपन, शिक्षण व भविष्यातील पुनर्वसनाच्या दृष्टिने त्यांना आर्थिक मदत सुद्धा गरजेची आहे. नुकतीच राज्य सरकारने याबाबत कोविद-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना रु. पाच लाखाची आर्थिक मदत व बाल संगोपन योजना लागु करण्या बाबत निर्णय घेतला, याचे स्वागत आहे.

  परंतु या बालकांच्या बाबत त्यांचे इतर खर्चा सोबत आरोग्य व शिक्षण याचा विचार करता राज्यातील बाल संगोपन योजना अंतर्गत मिळणारी रक्कम (प्रति माह 1100/-) अत्यल्प आहे. तसेच राज्यात इतर कोणत्याही कारणांनी दोनही पालक गमावलेल्या बालकांची व्यथा सुधा कोविद-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांसारखीच आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोविड -19 कोरोना संसर्गात पालकांचे (कर्ता पालक किंवा दोनही पालक) छत्र हरवलेल्या बालकां सोबतच इतर कोनत्यही कारणांनी दोनही पालक गमावलेल्या बालकांना रुपये पाच लाखाच्या आर्थिक मदती सोबतच वयाच्या 21 वर्षापर्यंत मासिक तीन हजार रुपये,आरोग्य विमा व पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात यावे अशी विनंती डॉ. विटनकर यांनी आपल्या पत्रात केली आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145