
नागपूर : काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा दिल्लीतील बस प्रवासादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या व्हिडिओमध्ये श्यामकुमार बर्वे हे प्रतिभा धानोरकर यांच्या गालाला हात लावताना दिसत असल्याने त्यांना चापट मारल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता खुद्द प्रतिभा धानोरकर यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले की, श्यामकुमार बर्वे यांनी आपल्याला चापट मारलेली नाही. आम्ही सर्व खासदार एकमेकांसोबत भावा-बहिणीप्रमाणे राहतो. श्यामकुमार बर्वे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यामुळे या घटनेला विनाकारण वेगळे स्वरूप देऊन बातमी बनवण्याची गरज नव्हती, असे त्यांनी सांगितले.
महिला खासदाराची बदनामी करणे योग्य नाही-
व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना धानोरकर म्हणाल्या की, एखाद्या महिला खासदाराची अशा प्रकारे बदनामी करणे अजिबात योग्य नाही. या प्रकरणावरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्यात आल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. अशी तक्रार करणारे आमचे हितचिंतक असू शकतात किंवा राजकीय विरोधकही असू शकतात, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, श्यामकुमार बर्वे यांनी खरोखरच आपल्याला चापट मारली असती, तर आपण स्वतः काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली असती. त्यामुळे या व्हिडिओवरून चुकीचे अर्थ काढू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
नेमकी घटना काय होती?
१ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या महारॅलीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक खासदार दिल्लीला गेले होते. या रॅलीसाठी सर्व खासदार एका बसमधून रामलीला मैदानाकडे रवाना झाले होते. याच बस प्रवासादरम्यान प्रतिभा धानोरकर, श्यामकुमार बर्वे आणि मुंबई काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्यात संवाद सुरू होता.
या संभाषणादरम्यान श्यामकुमार बर्वे यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या गालाला हात लावल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर सोशल मीडियावर या प्रसंगाबाबत विविध दावे आणि चर्चांना सुरुवात झाली. काहींनी याला चापट मारल्याची घटना म्हटले, तर काहींनी हा केवळ मस्करीचा प्रकार असल्याचा अंदाज व्यक्त केला.
धानोरकरांच्या स्पष्टीकरणानंतर चर्चांना पूर्णविराम?
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि वरिष्ठ नेतृत्वाकडे करण्यात आलेल्या कथित तक्रारींचीही चर्चा रंगली होती. मात्र, आता प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः पुढे येत श्यामकुमार बर्वे यांनी चापट मारल्याचा दावा फेटाळला आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, सोशल मीडियावरील चर्चांनाही वेगळी दिशा मिळाली आहे.



