मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या आगाऊ आर्थिक मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येही येत्या एक-दोन दिवसांत आर्थिक मदत जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचे सांगितले.यासोबतच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे या घोषणेतून स्पष्ट झाले आहे.
७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये, २१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि मंत्र्यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, या घोषणांमुळे राज्यातील शेतकरी वर्गाचे या मदत प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.




