Published On : Sun, Jun 30th, 2019

प्रवासी रेल्वे गाड्यांची झाडाझडती

साडेचार हजार फुकट्यावर कारवाई

नागपूर विना तिकीट प्रवास करू नये, असे नेहमीच रेल्वे तर्फे सांगितले जाते. शिवाय अभियानही राबविले जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत फुकट्यांची संख्या वाढतच आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने फुकट्या प्रवाशांविरूध्द अभियान राबवून १३ लाखांचा दंड वसूल केला. यावेळी साडेचार हजार फुकट्यांवर कारवाई केली.

संपूर्ण नागपूर विभागात १९ ते २५ जूनदरम्यान हे अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत एकूण १६१ प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये झाडाझडती घेण्यात आली. महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करण्यात आली. एकही प्रवासी तपासणीशिवाय विभागातून पुढे जाऊ शकणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली होती. आठवडाभरात तिकीट न घेता प्रवास करणारे ५०४ प्रवासी आढळले. त्यांच्याकडून २.९७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. अनधिकृत डब्यातून प्रवासाचे तब्बल १ हजार ६२७ प्रकरणे उघडकीस आली. त्यांच्याकडून एकूण ७ लाख ५४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नोंदणीशिवाय मालवाहतुकीची २ हजार ४५१ प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांमध्ये २.४५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय रेल्वेगाड्या आणि रेल्वेस्थानकावर अस्वच्छता पसरविणाºयांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले होते. अस्वच्छता पसरविणाºया ५५ जणांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याकडून १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या अभियानात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलातील जवानांचा समावेश होता. अशा प्रकारची कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन शोभना बंदोपाध्याय यांनी केले आहे.