Published On : Fri, Jul 31st, 2020

खाद्यान्नासाठी वापरण्यात येणार्‍या वनस्पती लोण्यावर शासनाचे नियंत्रण असावे ना. नितीन गडकरींचे पंतप्रधानांना पत्र

Advertisement

नागपूर: खाद्य पदार्थ तयार करणार्‍या विविध हॉटेल-रेस्टॉरंट व अन्य ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रेते वनस्पती लोण्याचा (मार्गारिन) खाद्य पदार्थासाठी अधिक वापर करीत आहेत. यामुळे दुधापासून बनविण्यात येणार्‍या लोण्याच्या विक्रीवर त्याचा विपरित परिणाम होत असून शेतकर्‍याचे दूध संकलन वाढून दुधापासून बनविण्यात येणार्‍या लोण्याचा वापर अधिक वाढावा. यासाठी वनस्पती लोण्यावर शासनाचे नियंत्रण असावे, या उद्देशाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठविले होते.या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेऊन ‘फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया’ (एफएसएसएआय) या शासकीय संस्थेला या संदर्भात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. दुधापासून मिळणारे लोणी

आरोग्यास लाभकारक आहे, तर वनस्पतीपासून बनविण्यात येणार्‍या लोण्यात आरोग्यास पोषक तत्त्वे नसतात. देशात 150 कंपन्या विविध ठिकाणी वनस्पती लोणी तयार करीत आहेत. वनस्पती लोण्याच्या वापरामुळे अनावश्यक कोलेस्टेरॉल वाढून हृदयासंबंधी विकार बळावण्याची शक्यता असते. यामुळे गायी-म्हशीच्या दुधापासून तयार होणार्‍या लोण्याच्या विक्रीवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी शेतकर्‍याचे दूध संकलन कमी होत आहे. शेतकर्‍याचे दूध संकलन वाढून आरोग्यास लाभकारक दुधापासून तयार करण्यात येत असलेल्या लोण्याची विक्री वाढावी हा या पत्रामागील उद्देश आहे.

या संदर्भात एफ़एसएसएआयने खुलासा करीत ना. गडकरी यांना कळविले आहे की, बेकरी आणि वनस्पती लोणी (मार्गारिन) तयार करणार्‍या कंपन्यांना लोण्यामध्ये 5 टक्केपेक्षा अधिक वनस्पती लोणी वापर न करण्यासाठी मर्यादा टाकण्यात आल्या. 2021 पर्यंत हे प्रमाण 3 टक्क्यांवर तर 2022 पर्यंत हे प्रमाण 2 टक्क्यांवर आणण्यात येईल.

एफएसएसआयएच्या 2011 च्या कायद्यानुसार मार्गारिनपासून जे पदार्थ तयार करण्यात येतील त्या सर्व उत्पादनांवर लेबल व पॅकिंगवर ‘ट्रान्स फॅट’चे प्रमाणाची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून (मार्गारिनसाठी) ‘डेअर अ‍ॅनालॉग’ची व्याख्या स्पष्ट करण्यात आली असून यात संबंधित उत्पादनांचे नावासोबत तयार करण्यात आलेले उत्पादन मार्गारिनपासून बनविण्यात आले काय याचा उल्लेख संबंधित कंपनीला करावा लागेल.

मार्गारिनपासून तयार करण्यात आलेले पदार्थ व त्या उत्पादनाच्या लेबलवर ‘हे डेअरी उत्पादन नाही’ असे ठळक अक्षरात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचेही एफएसएसआयएने म्हटले आहे.

तसेच मार्गारिन वापरून तयार करण्यात आलेल्या पदार्थांसाठ़ी वेगळा ‘लोगो’ देण्यात येईल. भेसळ टाळणे व ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून लेबलवर नाव टाकण्यात यावे. दुधापासून तयार करण्यात आलेले लोणी वापरून संबंधित पदार्थ बनविला तर शेतकर्‍याचे दूध अधिक विक्री होईल हा उद्देश ठेवून 2011 च्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. या संदर्भात अधिक जनजागृती करण्यात येईल, असेही एफएसएसआयने म्हटले आहे.