
नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग चौकात कारमधून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याच्या प्रकरणात क्राईम ब्रँच युनिट-४ने आरोपीला वणी येथून अटक केली. रोशन अशोक मोहिते उर्फ गोट्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटकेनंतर आरोपीला पुढील तपासासाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास हसनबाग येथील रहिवासी आबिद खान मोहम्मद खान हे दुचाकीने घरी जात होते. हसनबाग चौकातील डीएल मोटर्सजवळ फ्लायओव्हरखाली वळत असताना त्यांना समोरून एक कार येताना दिसली. याचवेळी कारमधील व्यक्तीने खिडकीतून हात बाहेर काढत पिस्तूलने हवेत गोळी झाडल्याचा आरोप आहे.
गोळीबारानंतर कार चालकाने वेगाने कार घटनास्थळावरून पळवून नेली. अचानक झालेल्या फायरिंगमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आबिद खान यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान संबंधित कार रोशन मोहितेच्या नावावर असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला. अखेर क्राईम ब्रँच युनिट-४च्या पथकाने रोशन मोहितेला वणी येथून अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी रोशनचा हसनबाग परिसरातील सिराज नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच व्यक्तीचा शोध घेत रोशन हसनबाग परिसरात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सिराज न सापडल्याने त्याने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
या प्रकरणात गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल, कार तसेच आरोपीसोबत असलेल्या इतर व्यक्तींच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



