
मुंबई : पायधुणी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर झालेल्या या मृत्यूंमुळे आधीच खळबळ उडाली होती; आता अहवालामुळे प्रकरण आणखी गूढ बनले आहे.
प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत मृतांच्या मेंदू, हृदय आणि आतड्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचा रंग हिरवट झाल्याचे आढळले आहे. तज्ज्ञांच्या मते, असा बदल सामान्य अन्न विषबाधेमध्ये क्वचितच दिसतो. एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये असे बदल दिसणे म्हणजे शरीरात एखाद्या विषारी घटकाचा वेगाने प्रसार झाल्याचे संकेत मानले जातात.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृतांपैकी अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरात ‘मोर्फिन’सारख्या वेदनाशामक औषधाचे अंशही आढळले आहेत. त्यामुळे हा केवळ अन्नातून झालेला अपघाती प्रकार आहे की जाणूनबुजून घातपात, याबाबत संशय अधिकच वाढला आहे.
घटनेनुसार, २५ एप्रिलच्या रात्री कुटुंबाने बिर्याणी खाल्ली होती आणि झोपण्यापूर्वी कलिंगड खाल्ले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना उलट्या, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने JJ Hospital येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने घरातून बिर्याणी, कलिंगड, पाणी, भात, चिकन, खजूर आणि मसाले असे विविध ११ नमुने जप्त करून रासायनिक विश्लेषणासाठी पाठवले होते. केवळ अन्नामुळे इतक्या झपाट्याने विषबाधा होणे शक्य आहे का, हा प्रश्न तज्ज्ञांनाही पडला होता.
आता फॉरेन्सिक अहवालानंतर तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता असून, विषारी पदार्थ, औषधांचा अतिरेक किंवा इतर कोणता घातपात यासंदर्भात विविध अंगांनी चौकशी सुरू आहे.
या प्रकरणातील प्रत्येक नव्या उघडकीमुळे रहस्य अधिकच गडद होत असून, चौघांच्या मृत्यूमागचे खरे कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








