Published On : Tue, May 12th, 2020

धक्कादायक! नागपूर जिल्ह्यात पवनी येथील तहसीलदारांच्या वाहनाला रेतीमाफियाकडून धडक?

Advertisement

नागपूर: ‘लॉकडाऊन’ मध्ये सुरू असलेल्या अवैध रेतीच्या वाहतूकीसंदर्भात, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाईकरिता सज्ज असलेली पवनी (जि.भंडारा) महसूल मंडळाची टीम रेतीमाफियाच्या जीवघेण्या कारनाम्यातून आज (दि.१२) थोडक्यात बचावली. तहसीलदारांच्या वाहनाला धडक देण्याची व तलाठ्याला मारहाणीचा प्रयत्न करत टिप्पर व रेतीमाफियाने पळ काढल्याची ही घटना आज (दि.१२) पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

घटना अशी की, भंडारा जिल्ह्यातील पवनी लगतच्या गुडेगाव रेतीघाटावरून आठ टिप्पर अवैध रेतीची छुप्या मार्गाने वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पवनीचे तहसीलदार गजानन कोकोडे यांना मिळाली होती. त्याआधारावर पहाटे चार वाजताच्या सुमारास तहसीलदार कोकोडे, मंडळ अधिकारी दिलीप कावठे, तलाठी रणजीत सव्वालाखे, तातोबा पाटील ही महसूल मंडळाची टीम एम.एच. ३२ ए.एच. ७३०८ या वाहनाने कारवाई करीता लगतच्या निलज फाटा (जि.भंडारा) परिसरात पोहचली. दरम्यान अवैध रेती भरलेले दोन टिप्पर भुयारमार्गे येतांना दिसताच, कारवाईकरिता सज्ज असलेल्या पथकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पुढे काही अंतरावरील संजीवनी ढाबा परिसरात हे दोन्ही टिप्पर थांबले. त्यांच्या मागोमाग स्कॉर्पिओ क्र. एम.एच.४० ८६७५ मधून येणारा टिप्पर मालक कलाम खान रा. नागपूर हा सुध्दा तेथे आला.

दरम्यान तहसीलदार कोकोडे यांनी टिप्पर क्र. एम.एच. ४० बी.एल. ८६७४ च्या चालकास टिप्पर तहसील कार्यालय पवनी येथे नेण्याचे बजावले. यावेळी कार्यवाहीकरीता तलाठी रणजीत सव्वालाखे सदर टिप्पर मध्ये चढताच, चालकाने टिप्परसह पळ काढला. पुढे भिवापूर परिसरातील मरूनदी वळणावर टिप्पर थांबवून चालकाने तलाठी सव्वालाखे यांना खाली उतरविले. शिवाय हातात दगड घेऊन मारहाणीचा प्रयत्न केला.

‘आॅखो देखा’ या प्रकाराने घाबरलेले तहसीलदार व त्यांची टिम लागलीच तलाठी सव्वालाखे यांच्या बचावाकरिता पाठलाग करीत मरूनदी पुलावर पोहचली. दरम्यान टिप्पर चालकाने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देत, घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र अंगाला थरकाप उडविणा-या या घटनेने महसूल प्रशासन भयभीत झाले आहे.

माहिती मिळताच, भिवापूर पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. वृत्त लिहेस्तोवर तहीलदारांकडून तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. मात्र घटना नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या अगदी? सीमेवर झाल्यामुळे घटनेची नोंद नेमकी कोणत्या हद्दीत करायची यावरून संभ्रम कायम होता.