नागपूर: 13 फेब्रुवारी रोजी सायकलस्वाराला कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या 56 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान 24 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव सुरेश गोडघाटे (वय 56 वर्षे, रा. श्रीहरी नगर, मानेवाडा) असे आहे. ते हातमजुरीचे काम करत होते.
माहितीनुसार, गोडघाटे 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.15 वाजता मनीषनगर येथून कामावरून घरी सायकलने जात होते. बेसाकडून ओमकार चौकाकडे जाताना सह्यांद्री लॉनसमोर जयवंत नगर कडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने (एमएच ४०- सी क्यू ३९६४) त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांना डोक्याला, पाठीला, छातीला, उजव्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तातडीने शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना 24 फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार कार चालकाचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार अरुण कोल्हे करीत आहेत.