अमरावती : नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून चोरीला गेलेली तब्बल 1.53 कोटी रुपयांची शिवशाही बस अमरावती पोलिसांनी अवघ्या एका दिवसात शोधून काढत आंतरराज्यीय बसचोराला अटक केली आहे. या कारवाईमुळे बस चोरी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजापेठ पोलिस ठाण्याचे बीट मार्शल सारंग आदमणे आणि विजय धुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी नंदा मार्केट परिसरात छापा टाकून एमएच-49 BH-8258 क्रमांकाची शिवशाही बस जप्त केली. तर आरोपीला गद्रे चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने आपले नाव विष्णू गणपती नीलावर (वय 23), रा. हयातनगर, जिल्हा रंगारेड्डी (तेलंगणा) असे सांगितले. त्याने 1 जुलै 2026 रोजी रात्री नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकात चार्जिंगसाठी उभी असलेली शिवशाही बस चोरल्याची कबुली दिली.
पोलिस तपासात आरोपीने तेलंगणा, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि नांदेडसह विविध भागांतून सुमारे 20 बसांची चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही बस चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर आणि डिस्क काढून त्यांची विक्री करत असे, तर उर्वरित भाग घटनास्थळीच सोडून देत असल्याचे तपासात समोर आले आहे.
जप्त करण्यात आलेल्या शिवशाही बसची अंदाजे किंमत 1.53 कोटी रुपये असून, या प्रकरणी नागपूरच्या गणेशपेठ पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त बस गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




