Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रोडरेजचा थरार; ७ ते ८ दुचाकीस्वारांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण!

Advertisement


नागपूर : नागपुरातील मानकापूर परिसरात रोडरेजची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री घरी परतणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा ७ ते ८ दुचाकीस्वारांनी पाठलाग करून त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर दगडाने कारची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणातील सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल मधुसूदन सिंह (वय ३५) हे एमआयडीसी वाहतूक शाखेत कार्यरत असून, २८ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ते जरीपटका येथून आपल्या महिला मैत्रिणीसोबत ह्युंदाई व्हर्ना कारने मानकापूर येथील घरी परतत होते.

मार्टिन नगर पुलाच्या चढावर असताना ७ ते ८ दुचाकीस्वार भरधाव आणि झिगझॅग पद्धतीने वाहन चालवत त्यांच्या कारसमोर येत होते. त्यामुळे कुणाल सिंह यांनी हॉर्न वाजवला. त्यानंतर दुचाकीस्वारांनी बाजू दिली आणि कार पुढे निघाली.

मात्र मानकापूर चौकाजवळ पोहोचताच दुचाकीस्वारांनी कारला मागून धडक दिली. त्यानंतर एका बुलेटस्वाराने कारचा रस्ता अडवला आणि काही क्षणांतच इतर साथीदारही तेथे जमा झाले.

यानंतर आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत कार न थांबवल्याचा राग व्यक्त केला. एका आरोपीने दगडाने कारच्या बोनटवर प्रहार केला, तर दुसऱ्याने मागील काच फोडून वाहनाचे मोठे नुकसान केले.

Advertisement

कुणाल सिंह कारमधून खाली उतरताच आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका आरोपीने दगडाने त्यांच्या मान आणि पाठीवर वार केल्याने ते जखमी झाले.

घटनास्थळी स्थानिक नागरिक जमा होताच आरोपी तेथून पसार झाले. मात्र काही नागरिकांनी एका दुचाकीचा नोंदणी क्रमांक टिपून ठेवला. त्याच धाग्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी सर्व आरोपींची ओळख पटवली.

मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कालसेकर यांनी सांगितले की, या प्रकरणातील काही आरोपी अल्पवयीन आहेत. सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत बेकायदेशीर जमाव, दंगल, जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ, मालमत्तेचे नुकसान आणि मारहाण यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील कलमे जामीनपात्र असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.