Published On : Tue, Jul 31st, 2018

आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपासोबतच जाणार

Advertisement

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वात आधी राजीनामा देत औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु करून आणि त्यानंतर विधानभवनातील गांधीजीच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे. मराठा आरक्षणाबाबत काल उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटण्याचे टाळले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना भाजपसोबत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मातोश्री’वर बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेले सेनेचेच आमदार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास नकार दिला. त्यानंतर मातोश्रीवर पूर्व नियोजित बैठक पार पडली.

दरम्यान, जो पर्यत मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही, तो पर्यत विधानभवनातील गांधीजीच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणारे हर्षवर्धन जाधव यांना कालच मुंबई पोलीसांनी आपल्या ताब्यात घेऊन अटक केली होती. आंदोलन करण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याच्या कारणांवरून त्यांना अटक करण्यात आली होती.