Published On : Fri, May 28th, 2021

लॉकडाऊनच्या काळात निराश्रितांना ‘शिवभोजन’ केंद्राची संजीवनी

वर्षभरात साडेसहा लक्ष नागरिकांची भूक भागवली

 

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर : नागपूर शहरातील पूर्वीच्या 10 व आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या एकूण पाच अशा 15 शिवभोजन केंद्रावरून लॉकडाऊनच्या काळात निराश्रित, निराधार नागरिकांना मोफत शिवथाळीचे वितरण सुरू आहे. वर्षभरात साडेसहा लक्ष थाळींचे वितरण झाले असून दररोज दीड हजार लोकांना याचा लाभ मिळत आहे.

‘ब्रेक द चैन ‘ या मोहिमे अंतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ‘कडक निर्बंध’ लागल्याने घराबाहेर पडणे बंद झाले. नागपूर सारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या जिल्ह्यासाठी हे अत्यावश्यक होते. मात्र ज्यांच्याकडे स्वयंपाक घरच नाही, स्वतःचे घरच नाही, कुठेतरी निवारा शोधून आयुष्य काढणे अशीच ज्या निराश्रितांची परिस्थिती आहे. ज्यांच्यासाठी कुणाच्यातरी मेहरबानीने रोजचे अन्न मिळते. शिळेपाके मागून ज्यांना जगावे लागते. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर, मशिद व अन्य धार्मिक ठिकाणाच्या परिसरात घरून लोकांनी आणलेल्या अन्नाच्या, हॉटेलमधील उरलेल्या अन्नाच्या बळावर ज्यांचे जगणे सुरू आहे, अशा सर्व निराक्षित, रोजच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालेल्यांना या काळात उपासमारीची वेळ आली.

शंभर वर्षात अशा पद्धतीची भयानक वेळ मानवी समुदायांवर पहिल्यांदाच आली आहे. घराबाहेर माणूस पडूच नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या काळात शिवभोजन केंद्रावरील शिवथाळीने अनेकांच्या जगण्याची उमेद जागवली. या केंद्रांवर गेल्या महिन्याभरापासून ज्यांचे आयुष्य उभे आहे. त्यापैकी अनेकांना बोलणे सुद्धा येत नाही. काही विमनस्क, अपंग आहेत. मात्र या केंद्राकडे हात दाखवून ते हात जोडतात. राज्य शासनाने ही योजना सुरू करून ज्यांचे कोणी कोणीच नाही, अशांना उपासमारी पासून वाचविले आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये बेवारस असणाऱ्या अशा लोकांना एक प्रकारे जगविण्याचे कामच शिवथाळीने केले आहे.

राज्यातील गरीब, गरजू, जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन ही योजना 1 जानेवारी 2020 पासून अंमलात आली. त्यानंतर गेल्या वर्षी पासून कोरोनाने राज्यात थैमान घातले. या काळात राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना योग्य नियोजन म्हणून सिद्ध झाली आहे. या थाळीमुळे ज्यांना खरोखर गरज आहे. त्यांची भूक भागविल्या गेली. या योजनेच्या लाभार्थ्यांकडून शासनाच्या या योजनेला शंभर टक्के गुण मिळतात… कारण सातत्याच्या लॉकडाऊनमुळे अनेक स्वयंसेवी संस्था व सेवाभावी काम करणाऱ्या संस्थांनाही वैद्यकीय कारणास्तव मर्यादा आल्या. मात्र शिवभोजन केंद्र अन्नपूर्णा ठरले आहे. पोटाची भूक भागविणारे हे ऐकमेव केंद्र ठरले आहे. त्यातही 15 एप्रिल पासून ही शिवथाळी मोफत करण्यात आली. त्यामुळे ज्यांच्याकडे कमाईचे कोणतेच साधन नाही. घर नाही. परिवार नाही, अशा सर्व निराश्रित,बेसहारा आर्थिक दुर्बल नागरिकांना यामुळे लाभ झाला आहे.

नागपूर शहरात जानेवारी 2020 ते मार्च 2021 या काळामध्ये कार्यरत एकूण दहा केंद्रांच्या माध्यमातून 6 लक्ष 48 हजार थाळीचे वितरण करण्यात आले. दररोज दीड हजार लोकांना या केंद्रावरून जेवण दिले जाते. एका केंद्रावरून दीडशे थाली वितरित होते. नागपुरात गेल्या आठवड्याभरापूर्वी पूर्वीच्या 10 केंद्रात आणखी 5 केंद्राची भर पडली आहे. 15 केंद्र सध्या सुरू आहे. आता हे सर्व केंद्र निराश्रितांसाठी संजीवन केंद्र बनले आहे.

 

Advertisement
Advertisement