Published On : Wed, Jul 11th, 2018

राजदंड पळविणे हा शिवसेनेचा ‘स्टंट’!: विखे पाटील

Advertisement

नागपूर: नाणार प्रकल्पावरून राजदंड पळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे निव्वळ ‘स्टंट’ होता. या प्रकल्पाला तोंडदेखला विरोध करून शिवसेना कोकणातील जनतेचा विश्वासघात करते आहे. शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

बुधवारी विधानसभेत घडलेल्या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी शिवसेनेच्या विश्वासार्हतेवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, मंगळवारी विधान परिषदेत नाणारचा मुद्दा उपस्थित झाला असता शिवसेना मूग गिळून बसली होती. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे सांगून त्यांचे उद्योगमंत्रीही गप्प बसलेले होते. या दुटप्पी भूमिकेसाठी वर्तमानपत्रांनी झोडून काढल्यानंतर शिवसेनेला दुसऱ्या दिवशी खडबडून जाग आली आणि म्हणून ‘डॅमेज कंट्रोल’साठी त्यांना राजदंड पळविण्याची नौटंकी करावी लागली.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नुकताच नाणार प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता. त्या मोर्चात शिवसेनेने “आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर… भाजप सरकार जमीनचोर…”, “एक दो एक दो… भाजप सरकार फेक दो…” अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र याच घोषणा सभागृहात देण्याची हिंमत शिवसेनेने दाखवली नाही. रस्त्यावर एक अन् विधीमंडळात वेगळीच भूमिका मांडून शिवसेना कोकणवासियांची शुद्ध फसवणूक करीत असल्याचा घणाघात विखे पाटील यांनी केला.

… तर आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असता!

शेतकरी कर्जमाफी तसेच बोंडअळी, मावा, तुडतुड्याच्या नुकसानभरपाई संदर्भात विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला मंत्री उत्तर देत असताना शिवसेनेने जाणीवपूर्वक गोंधळ घातला. खरे तर नाणारच्या मुद्यावर मी नियम 57 अन्वये प्रश्नोत्तराचा तास स्थगीत करून चर्चा करण्याबाबत सूचना दिलेली होती. त्यासंदर्भात मंत्र्यांच्या उत्तरानंतर नाणारवर निवेदन करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मला अनुमतीही दिलेली होती. शिवसेनेला नाणारवर बोलायचेच होते तर माझ्या निवेदनानंतरही त्यांना बोलता आले असते.

परंतु, शिवसेनेला केवळ ‘इव्हेंट’च करायचा असल्याने त्यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून गोंधळ सुरू केला. त्यावेळी विरोधी पक्षांनी ठाम भूमिका घेत ‘नाटकबाजी’ करणाऱ्या शिवसेनेला अगोदर संधी न देण्याचा आग्रह अध्यक्षांकडे धरला. अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या स्थगन प्रस्तावाअगोदर शिवसेनेला संधी दिली असती तर विरोधी पक्षांवर अन्याय झाल्याच्या निषेधार्थ मी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असता, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.