नवी दिल्ली: शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतचा बहुचर्चित खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी अपेक्षित होती. मात्र सुनावणीपूर्वीच न्यायालयाने ही बाब पुढे ढकलत पुढील शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुनावणी घेण्याचे ठरवले.
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या निकालाचा थेट परिणाम महापालिकांतील सत्ता-समीकरणांवर होणार असल्याचे मानले जात होते. मात्र अंतिम सुनावणी पुढे गेल्याने उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने २१ जानेवारी रोजी अंतिम युक्तिवाद घेण्याचे स्पष्ट केले होते. दोन्ही बाजूंच्या वकिलांना सुमारे पाच तासांचा वेळ देण्यात येणार असल्याचेही ठरले होते. आज किंवा उद्या निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सॉलिसिटर जनरल यांनी अन्य प्रकरणात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर दोन्ही पक्षकारांची मते जाणून घेत सुनावणी पुढील शुक्रवारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, वकील असीम सरोदे यांनी सकाळीच आज सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी सांगितले की दुपारी १ वाजल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्या विशेष खंडपीठासमोर अरावली डोंगररांगांबाबतच्या प्रकरणाची सुनावणी आहे. त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष, पक्षांतर आणि चिन्हाबाबतची सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी न्यायालयीन विलंबावर नाराजी व्यक्त केली. “लोकशाहीतील संस्थांवर असणारा विश्वास कमी होत चालला आहे. १५ वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल याचा अंदाज बांधता येत होता, मात्र आता तो विश्वास उरलेला नाही. देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाचे आहे, पण ३-३ वर्षे निर्णय लागत नसल्याने सामान्य जनतेत संभ्रम निर्माण होतो,” असे त्यांनी म्हटले.
आता या प्रकरणाकडे पुन्हा एकदा पुढील शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.









