मुंबई : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, e-KYC प्रक्रियेदरम्यान काही महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अर्जांमध्ये त्रुटी निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या निकषांनुसार पात्रता निश्चित करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्यात येणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून, याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, संबंधित लाभार्थी महिलांनी पडताळणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे सज्ज ठेवावीत व अंगणवाडी सेविकांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे e-KYC मधील त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळणार असून, खऱ्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सुनिश्चित होणार आहे.
राज्य शासनाच्या या पावलामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व प्रभावी होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.









