नवी दिल्ली :शिवसेना पक्षाच्या नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीवर सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठाने यापुढे कोणत्याही उपअर्जांवर सुनावणी न घेता थेट मुख्य याचिकेवर ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणी होईल, असं स्पष्ट केलं.
या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल तर एकनाथ शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी यांनी आपली बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी ऑगस्टमध्ये सुनावणी घेण्याची विनंती केली असता, न्यायालयाने पुढील दोन-तीन दिवसांत नेमकी तारीख निश्चित केली जाईल, असं सांगितलं.
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत या निर्णयाला विरोध केला होता. न्यायालयीन प्रक्रियेमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा वाद प्रलंबित आहे. दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील अशाच प्रकारचा तात्पुरता दिलासा मिळाल्यामुळे ठाकरे गटालाही त्याच प्रकारच्या आदेशाची अपेक्षा होती.
सध्या मनपा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, शिवसेना नाव-चिन्हाचा मुद्दा अधिकच महत्त्वाचा ठरतो आहे. कोर्टाने आता अंतिम सुनावणीची स्पष्ट दिशा दाखवली असल्याने ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑगस्टमधील सुनावणीचे निकाल शिवसेनेच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.