Published On : Sat, Aug 19th, 2017

उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना नेत्यांत धुसफूस, मंत्री गुलाबराव पाटील पदाधिकाऱ्यांवर भडकले

Advertisement

मुंबई: सत्तेत असूनही शिवसेनेचे मंत्री अापल्याच पदाधिकाऱ्यांची कामे करत नसल्याच्या ग्रामीण भागातील पक्षनेत्यांच्या तक्रारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडूनही फार काही सुधारणा झाली नसल्याचा प्रत्यय शुक्रवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुन्हा आला. नेत्यांनी या बैठकीत उद्धव यांच्यासमोरच मंत्र्यांवर हल्लाबोल केला. शेवटी उद्धव यांनी हस्तक्षेप करून हेवेदावे संपवून कामाला लागा, असे आदेश नेत्यांना दिले.

शिवसेना सत्तेत असल्यामुळे आपली कामे होतील, असा विश्वास शिवसेनेच्या ग्रामीण भागातील नेत्यांना होता, परंतु कामे होत नसल्याने प्रचंड नाराजी आहे. भाजपची कामे होतात, परंतु शिवसेनेचे मंत्री कामे करत नसल्याबाबत काही महिन्यांपूर्वी उद्धव यांच्याकडे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेते आणि मंत्र्यांमध्ये समन्वय साधण्याचे ठरले. दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, सुभाष देसाई, रामदास कदम काम करत नसल्याचा आरोप होता. उद्धव यांनी सर्व मंत्र्यांना शिवसेनेच्या नेत्यांची कामे करावीत, असे आदेश दिले. परंतु या आदेशालाही मंत्र्यांनी जुमानले नाही.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शुक्रवारी शिवसेना भवनात बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांसह खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्रीही काम करत नसल्याची तक्रार उपस्थितांनी उद्धव यांच्याकडे केली. मंत्री झालेले फक्त मंत्रिपदाची झूल पांघरून फिरतात, असेही काही जणांनी सांगितले.

जबाबदाऱ्या निश्चित
या बैठकीत मराठवाडा, नगर व सोलापूरची जबाबदारी रामदास कदम, विदर्भ दिवाकर रावते, उत्तर महाराष्ट्र व पुणे संजय राऊत तर ठाणे-कोकणची जबाबदारी सुभाष देसाईंवर सोपवण्यात आली. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची धुरा गजानन किर्तीकरांकडे असेल.

… आणि गुलाबरावांचा पारा चढला
काही ग्रामीण भागातील नेत्यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटीलही काम करीत नसल्याचे सांगताच बैठकीत गुलाबरावांचा पारा चढला. उद्धव यांच्यासमोरच ते तक्रार करणाऱ्या नेत्यांवर भडकले. ‘आम्ही पक्षाची कामे करतो, तुम्ही आम्हाला काय समजता? आम्ही काय कामे करतो त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांना आम्ही सतत देत असतो. आम्ही काय कामे केली हे पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विचारू नये,’ असे त्यांनी ठणकावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रस्त्यावर उतरून काम करा
भाजप आपला क्रमांक एकचा शत्रू असून त्याला टक्कर देण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करा, असे आदेश उद्धव यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. बैठकीनंतर उद्धव यांनी काही ठरावीक नेते आणि मंत्र्यांशी स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा केल्याचे समजते.

अराफत शेख यांच्या तक्रारीपासून धुसफूस
दोन दिवसांपूर्वी वाहतूक सेनेचे अध्यक्ष अराफत शेख यांनी दिवाकर रावते यांच्यावर ते जातीवाचक उल्लेख करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर काही शिवसैनिकांनी शेख यांनाच पक्षातून काढून टाका, अशी मागणी केल्याने शिवसेनेतील वाद उफाळून अाला. आता ग्रामीण भागातील पक्षनेते आणि मंत्र्यांत निर्माण झालेली दरीही या बैठकीतून स्पष्ट झाली.

Advertisement
Advertisement