मुंबई: मनसेच्या सहा नगरसेवकांना आपल्या गोटात खेचून शिवसेनेने घोडेबाजार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. नगरसेवकांच्या खरेदीसाठी हवाला ट्रान्झेक्शनच्या माध्यमातून झाल्याचा दावा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी अंमलबजावणी संचानालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
सोमय्या म्हणाले की, मनसेच्या 6 नगरसेवकांना शिवसेनेने पैसे देऊन आपल्या गोटात सामिल करून घेतले आहे. यासाठी पुष्पक बुलियन कंपनीचे चंद्रकांत पटेल यांच्या माध्यमातून हवाला ट्रान्झेक्शन झाल्याचा दावा त्यांनी केला. ईडी आणि एसीबीने याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे. पटेल याला काही दिवसांपूर्वी ईडीने अटकही केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिवसेनेने नगरसेवकांना पाच-पाच कोटी रुपयांत खरेदी केले होते.
नगरसेवकांना भेटणार राज ठाकरे
मुंबई महापालिकेत मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फुटल्याने राज ठाकरे सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसे नगरसेवकांची राज ठाकरे भेट घेणार आहेत.
मनसेचे कल्याण-डोंबिवली महापालिकेत 9, नाशिकमध्ये 5 आणि पुण्यात 2 नगरसेवक आहेत.