Published On : Wed, Oct 31st, 2018

चार वर्षात भाजप शिवसेनेने महाराष्ट्राचे वाटोळे केलेः खा. अशोक चव्हाण

औरंगाबाद :गेल्या चार वर्षात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. फक्त फसव्या घोषणा आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे मुख्यमंत्री काही करत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. पण या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करण्याची व जनतेचे दुःख जाणून घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांना वाटत नाही हे दुर्देव आहे. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून भाजप शिवसेनेने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज औरंगाबाद जिल्ह्यात आहे. फर्दापूर आणि कन्नड येथे विशाल जनसंघर्ष सभा संपन्न झाल्या. या सभेच्या सुरुवातीलाच देशाच्या दिवंगत पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी खा. चव्हाण यांनी अभिवादन केले. यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, आ. अब्दुल सत्तार, माजी आ. डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, सचिव विजय कामड, शाह आलम शेख, औरंगाबाद शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. नामदेवराव पवार आदी उपस्थित होते.

Gold Rate
10 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,600 /-
Gold 22 KT ₹ 1,01,900 /-
Silver/Kg ₹ 1,25,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खा. चव्हाण म्हणाले की, गेल्या चार वर्षात भाजप शिवसेना सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत नाही. कर्जमाफी मिळाली नाही. पीकविम्याचे हप्ते भरून घेतले पण नुकसान भरपाई मिळाली नाही. नविन पीक कर्ज मिळत नाही. दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत वातानुकुलीत कार्यालयात बसून माध्यमांना मुलाखती देत आहेत. खोटी आकडवारी देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करावा असे खा. चव्हाण म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भाजप शिवसेनेने खोटी आश्वासने देऊन जनतेची मते घेतली मात्र गेल्या चार वर्षात यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केली चार वर्षात शेकडो बैठका झाल्या अद्याप धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. मराठा मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न जाणिवपूर्वक चिघळवत ठेवून मराठा विरूद्ध इतर समाज असा संघर्ष पेटवण्याचा उद्योग सुरु आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट आहे. दररोज वृत्तपत्र उघडले की हत्या, अतिप्रसंग, विनयभंग याच्याच बातम्या वाचायला मिळतात. देशात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल महाराष्ट्रात आहे. सरकार इंधनावर कर व अधिभार लावून लोकांची लूट करत आहे. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. कर्जमाफीच्या जाहिराती दिल्या पण अद्याप कर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळाला नाही. सरकारच्या जाहिराती दमदार आणि कामगिरी सुमार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून मते घेतली. पण त्यांच्या स्मारकाचे काम अद्याप सुरु झालेले नाही. गेल्या चार वर्षात काही केले नाही. त्यामुळे आता मतांसाठी राममंदिराचा विषय काढत आहेत. गेल्या चार वर्षात राममंदिर का बांधले नाही? असा सवाल त्यांनी केला. मोदींनी दरवर्षी दोन कोटी युवकांना नोक-या देण्याचे आश्वासन दिले होते पण आता तरूणांना पकोडे विकायला सांगत आहेत. सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि मोदी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाला उपस्थित राहतात. एका सैनिकाच्या बदल्यात पाकिस्तानांच्या दहा सैनिकांचे शिर आणण्याची भाषा करणारे मोदी पाकिस्तानातून साखर घेऊन आले. खरी 56 इंचाची छाती सरदार पटेलांचीच होती, मोदींची नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्यातले भाजप शिवसेनेचे सरकार फक्त बोलण्यातच पटाईत आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. सहकार चळवळ मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे त्यासाठीच वारंवार कायद्यात बदल केले जात आहेत.

आ. नसीम खान म्हणाले की, केंद्रातले आणि राज्यातले सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. भाजपचे सरकार आल्यापासून अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचारात वाढ झाली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या सुरक्षेसाठी हे धर्मांध सरकार बदलावे लागेल असे ते म्हणाले.

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपल्या खास शैलीत भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

उद्या गुरुवार दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता औरंगाबाद येथील मराठवाडा सास्कृंतीक मंडळाच्या मैदावर विराट जाहीर सभेने जनसंघर्ष यात्रेच्या तिस-या टप्प्याची सांगता होणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Advertisement