Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Mar 18th, 2017

  धार्मिक अराजक निर्माण करून भाजपने दिल्लीत सत्ता मिळवली: शिवसेना

  मुंबई: भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे राममंदिर केले आहे, असा आरोप करत सत्तेतील मित्रपक्ष शिवसनेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केरताना, राममंदिरासाठी भाजपने देशपातळीवर आंदोलन केले, करसेवकांचे बळी दिले, देशभरात धार्मिक अराजक निर्माण करून दिल्लीची सत्ता मिळवली, पण पंचवीस वर्षांनंतरही राममंदिराचा पत्ता नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची अवस्था राममंदिरासारखी झाली आहे, असे म्हटले आहे.

  शिवसेनेचे मुखपत्र समजले जाणाऱ्या दै. सामनामध्ये ‘अयोध्येतील राममंदिर, महाराष्ट्रात कर्जमुक्ती आता होऊनच जाऊ द्या!!’, या मथळ्याखाली लेख लिहीण्यात आला आहे. या लेखात राज्य सरकरारव टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. टीकेचा रोख प्रामुख्याने राज्यसरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी संकटाने पुन्हा जमीनदोस्त झाला आहे. काँग्रेस राजवटीत तो भुईसपाट झाला व आत्महत्येच्या मार्गाने जाऊ लागला तेव्हा कर्जमुक्तीचा नारा शिवसेना-भाजप युतीनेच लावला होता. ‘सत्ता द्या, कर्जमुक्ती करू. सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना आधार देऊ’, असे सांगणारे व काँग्रेसकडे त्याची मागणी करणारे आपणच होतो. आता शेतकऱ्यांना पाठ दाखवून कसे चालेल!, अशी भावनाही या लेखात बोलून दाखवण्यात आली आहे.

  फडणवीसांना शिवसेनेचे आव्हान

  दरम्यान, सत्ता व नशा भल्याभल्यांची मती गुंग करते, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत मती गुंग करून चालणार नाही. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन रोज बंद पाडले जात आहे. ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली तेच लोक विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर सरकारला धारेवर धरीत आहेत हा विनोद मानला तरी त्यामुळे या प्रश्नाची दाहकता कमी होत नाही. मुख्यमंत्री म्हणतात, ‘कर्जमुक्तीवर बोलण्याचा अधिकार फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला आहे.’ मुख्यमंत्र्यांना हे पटतेय ना? मग त्यांनी कर्जमुक्तीचा बार उडवून शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करून दाखवावे, असे आव्हानच सामनात लिहिलेल्या लेखाच्या माध्यमातून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवले आहे.

  सामनातील इतरही काही महत्त्वाचे मुद्दे:

  • उत्तर प्रदेशातही सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन तुम्ही दिलेच आहे ना? त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडास आता पाने पुसू नका.
  • मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले की, कर्जमुक्ती राज्याच्या आवाक्याबाहेरची आहे. हे खरे असेल तर निवडणुकीआधी आश्वासने देऊन शेतकऱ्यांना फसवल्याबद्दल राज्याची माफी मागा.
  • फडणवीस सरकारच्या काळात ज्या तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या मृत शेतकऱ्यांच्या निराधार कुटुंबांचा मेळावा घेऊन त्यांची माफी मागा.
  • सचोटी, प्रामाणिकपणा, पारदर्शकता व राज्याच्या कल्याणाचा ठेका तुम्ही घेतला असेल तर शेतकऱ्यांचे जीव वाचवा.
   ‘एकदा कर्जमुक्ती केल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची गॅरंटी काय!’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
  • हे भयंकर आहे. दुसऱ्या कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री हे बोलला असता तर अशा मुख्यमंत्र्यांवर शिवसेना-भाजपने टीकेचे आसुड ओढलेच असते.
  • शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ३० हजार ५०० कोटींची गरज आहे. इतके पैसे कुठून आणायचे ही मुख्यमंत्र्यांची चिंता रास्त आहे, पण इच्छा असेल तर मार्ग निघेल.
  • उत्तर प्रदेशसारख्या राज्यात विजयप्राप्तीसाठी झालेल्या खर्चाचा आकडा यापेक्षा जास्त असल्याचा आरोप सुरू आहे.
  • मुंबईत शिवसेनेच्या पराभवासाठीही कोटी-कोटी रुपयांची ‘नोटाबंदी’ मोडली.
  • जिथून हा पैसा आला त्यांच्याच खिशात हात घाला, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्याच! अयोध्येत राममंदिर आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, आता होऊनच जाऊ द्या

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145